वैद्यकीय शिक्षण विभागाला उठवलं, चालवलं, पळवलं - मंत्री हसन मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:36 IST2025-10-28T12:35:23+5:302025-10-28T12:36:53+5:30
शेंडा पार्क येथे सीपीआरमधील एमआरआय, सीटीस्कॅनसह मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचं लोकार्पण

वैद्यकीय शिक्षण विभागाला उठवलं, चालवलं, पळवलं - मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर : माझ्यासाठी आमचे नेते अजित पवार यांनी सहकार खाते मागून घेतले होते. परंतु, मी वैद्यकीय शिक्षण विभागासाठी आग्रही राहिलो. या खात्याच्या माध्यमातून या विभागाला मी उठवलं, चालवलं आणि पळवलं, अशी प्रतिक्रिया राज्यभरातून येत आहे. याच पध्दतीने काम करत येथील सीपीआरचे ३०० कोटी रुपये खर्चून सुरू असलेले नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्रीहसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिली.
शेंडा पार्क येथे आयोजित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. तत्पूर्वी यांच्यासह आमदार अमल महाडिक, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या हस्ते सीपीआरमधील एमआरआय, सीटीस्कॅनसह मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे लोकार्पण करण्यात आले.
मुश्रीफ म्हणाले, देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शेंडा पार्कमधील काम सर्वांत वेगवान पध्दतीने सुरू आहे. यापुढे आमच्या रूग्णालयांमध्ये जितक्या महागड्या सेवा देणार आहोत, त्यासाठी ‘पब्लिक, प्रायव्हेट पार्टनरशीप’ धोरण आखण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व यंत्रणा सुसज्ज राहतील. शासकीय दराने जे डॉक्टर या सुविधा देतील, त्यांच्याकडे ही सेवा सोपवली जाईल. कॅन्सर रुग्णालयासाठीही धोरण आणण्यात आले असून, कोल्हापूरचे वैद्यकीय महाविद्यालय हे दुसऱ्या क्रमांकाच्या वर्गवारीत बसविण्यात आले आहे.
आमदार अमल महाडिक म्हणाले, दिग्विजय खानविलकर यांनी हे महाविद्यालय आणले. गिरीश महाजन यांनी त्यांच्या काळात सीपीआरसाठी ६०० कोटी रुपये दिले. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी अतिशय वेगवान पध्दतीने या विभागाला गती दिली. सर्वसामान्यांसाठी आरोग्य क्षेत्रात कसं काम करावं हे मंत्री मुश्रीफ यांच्याकडून मी शिकलो. आदिल फरास म्हणाले, रुग्णसेवा करून जनतेचा आशीर्वाद घ्या, ही हसन मुश्रीफ यांची शिकवण मोलाची मानून माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते समाजकारणात सक्रिय आहेत.
डॉ. गिरीष कांबळे यांनी स्वागत केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे यांनी आभार मानले. यावेळी युवराज पाटील, भैय्या माने, महेश सावंत, रोहित तोंदले उपस्थित होते. अनिकेत जाधव, हर्षद शहा, सोहेल अहमद या कंत्राटदारांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
आरोग्यमंदिराचा जीर्णोध्दार
खानविलकर यांनी स्थापन केलेल्या या सीपीआरकडे २००५नंतर दुर्लक्ष झाले. आमदार अमल महाडिक यांनी मध्यंतरी खूप प्रयत्न केले. परंतु, भग्नावस्थेत चाललेल्या या आरोग्यमंदिराचा जीर्णोध्दार करण्याचा विडा मंत्री मुश्रीफ यांनी उचलला आणि हे काम वेगाने सुरू असल्याचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांनी यावेळी सांगितले.