पीएम किसानवरून महसूल-कृषीच्या वादात शेतकरी दाणीला, कोल्हापुरात मनसे आक्रमक
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: April 18, 2023 16:50 IST2023-04-18T16:50:02+5:302023-04-18T16:50:26+5:30
मनसे कार्यकर्ते निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घुसले

पीएम किसानवरून महसूल-कृषीच्या वादात शेतकरी दाणीला, कोल्हापुरात मनसे आक्रमक
कोल्हापूर : पीएम किसान योजनेचे काम कोणी करायचे या महसूल व कृषीमधील वादामुळे शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, करवीर, कागल, पन्हाळा व शाहुवाडी तहसिलदारांनी त्यांचे युजरआयडी जाणीवपूर्वक डिॲक्टिव्ह ठेऊन शेतकऱ्यांची कुचंबणा केली आहे असा आरोप करत मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घुसले. यामुळे पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये काही काळ झटापट झाली, तर आतमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांच्यासोबत वादावादी झाली. चर्चेनंतर कांबळे यांनी या विषयावर २० तारखेला बैठक बोलावली आहे.
पीएम. किसान योजनेचे काम कोणी करायचे या महसूल व कृषीमधील वादातून जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील तहसिलदारांनी युजरआयडी डिॲक्टिव्ह ठेवले आहेत. या श्रेयवादावर शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी विश्वचषकाच्या आकारातील कटआऊट निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी आणले होते.
हे अधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारावर येऊन स्विकारावे असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते, पण अर्ध्या तासानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने कार्यकर्ते घोषणाबाजी करत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घुसले. दरम्यान पोली स व कार्यकर्त्यामध्ये झटापट झाली. कार्यकर्त्यांनी चषकाची प्रतिकृती निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांना देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी स्विकारला नाही. तसेच दालनात घुसल्याने काबंळे व कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली.