गोठवणारी थंडी, सलग पाच दिवस बर्फवृष्टी; कोल्हापुरातील नृत्यांगनांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर केले ‘भरतनाट्यम्’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:34 IST2025-11-13T13:32:51+5:302025-11-13T13:34:44+5:30
उणे आठ अंश तापमानामध्ये सर्व मनोबल एकवटून त्यांनी १८ हजार २०० फूट उंचीवर नृत्य सादरीकरण केले.

गोठवणारी थंडी, सलग पाच दिवस बर्फवृष्टी; कोल्हापुरातील नृत्यांगनांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर केले ‘भरतनाट्यम्’
कोल्हापूर : भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यप्रकारात नवनवीन विक्रम प्रस्थापित केलेल्या तपस्यासिद्धी स्कूल ऑफ ‘भरतनाट्यम्’च्या नृत्यांगनांनी थेट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर ही कला सादर केली. नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील, शिष्या दिव्या वारके, मिताली महाराज आणि प्रांजल दळवी या चौघींनी थेंगबोचे मॉनेस्ट्री (१३,००० फूट), एव्हरेस्ट बेस कॅम्प (१७,६५० फूट) आणि काला पत्थर (१८,२०० फूट) या ठिकाणी भरतनाट्यम या नृत्यकलेतून सादर करून एव्हरेस्टला मानवंदना दिली.
थेंगबोचे येथे गणपती स्तुती, काला पठार येथे शिव श्लोक, एव्हरेस्ट बेस कॅम्प येथे संयोगिता पाटील यांनी सहा मिनिटांचा श्रीराम स्तुती श्लोक सादर केला. नंतर चौघींनी भज गोविंदम ही कृष्णवंदना व मंगलम् सादर केले. एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प सर करताना वाटेत तापमानामध्ये चढ-उतार आणि गोठवणारी थंडी होती. सलग पाच दिवस बर्फवृष्टी होत होती. अशा वातावरणात त्यांनी नृत्य सादर केले.
पहिले सादरीकरण हे १२ हजार ६८७ फुटांवर, दुसरे सादरीकरण १७ हजार ६५० फूट उंचीवर झाले. यानंतरचा प्रवास अजूनच अवघड व शर्थीचा झाला. अतिशय कमी म्हणजे उणे आठ अंश तापमानामध्ये सर्व मनोबल एकवटून त्यांनी १८ हजार २०० फूट उंचीवर नृत्य सादरीकरण केले.