नियमबाह्य खत विक्री, कोल्हापूर जिल्ह्यात १२ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:05 IST2025-08-09T12:04:31+5:302025-08-09T12:05:30+5:30
कृषी विभागाचा दणका : अनुदानित खतांची विक्री फक्त ई-पॉस प्रणालीद्वारेच करा

नियमबाह्य खत विक्री, कोल्हापूर जिल्ह्यात १२ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित
कोल्हापूर : कृषी विभागाच्या तपासणीदरम्यान नियम भंग केल्याचे आढळल्याने जिल्ह्यातील १२ कृषी सेवा केंद्रांचे परवाने कृषी विभागाने निलंबित केले. त्यामध्ये एकट्या दानोळी (ता.शिरोळ) येथील तीन केंद्रांचा समावेश आहे.
कृषी विभागाने जिल्ह्यात अलीकडेच राबवलेल्या तपासणी मोहिमेत काही कृषी सेवा केंद्रांकडून नियमबाह्यपणे ऑफलाईन पद्धतीने खतांची विक्री झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ई-पॉस प्रणालीतील नोंदी व प्रत्यक्ष साठ्यात तफावत आढळून आल्याने अशा सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांनी शेतकऱ्यांना अनुदानित खतांची विक्री करताना डिजिटल विक्री यंत्र (ई-पॉस प्रणाली) द्वारेच विक्री करणे बंधनकारक असून, याबाबत केंद्र सरकारच्या स्पष्ट सूचना आहेत. शेतकऱ्यांनी देखील अनुदानित खते खरेदी करताना केवळ ई-पॉस यंत्रामार्फतच खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी राजेंद्र माने यांनी केले आहे.
अनुदानित खत युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश, डोएपी, १०-२६-२६ आदी खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारेच वैध आहे. किरकोळ खत विक्रेत्यांनी साठा ई-पॉस प्रणालीवर उपलब्ध झाल्यानंतरच खतांची विक्री सुरू करावी. अनुदानित खतांची विक्री ई-पॉसशिवाय करणे ही गंभीर बाब आहे. ऑफलाइन पद्धतीने विक्री केल्यामुळे कृषी सेवा केंद्रातील ई-पॉस प्रणाली व प्रत्यक्ष खतसाठ्यात तफावत आढळून येत आहे. भरारी पथकाद्वारे विविध कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली.
परवाने निलंबित झालेली कृषी केंद्रे
- जंगम कृषी उद्योग,शाहूपुरी - कोल्हापूर.
- रेणुका ट्रेडर्स, शाहूपुरी, कोल्हापूर
- कृषीधन ॲग्रो सर्व्हिस, दानोळी
- पद्मावती कृषी सेवा केंद्र, दानोळी
- बसवेश्वर फर्टिलायझर, दानोळी
- ओंकार कृषी सेवा केंद्र, लाटवडे.
- गुरुकृपा ट्रेडर्स, साळवण-गगनबावडा
- माऊली कृषी सेवा केंद्र, किणे-आजरा.
- मनाली कृषी सेवा केंद्र, कूर- भुदरगड.
- राज फर्टिलायझर आणि केमिकल्स, जयसिंगपूर.
- शिवतेज कृषी सेवा केंद्र, गिरगाव- करवीर
- शेतकरी शेती विकास केंद्र, बाजारभोगाव