कोल्हापुरात घातक मेफेनटेरमाइन सल्फेट इंजेक्शनची अवैध विक्री, प्रयाग चिखलीतील विक्रेत्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 12:22 IST2025-06-23T12:21:56+5:302025-06-23T12:22:11+5:30
दिल्लीतून कुरिअरने मागवले

कोल्हापुरात घातक मेफेनटेरमाइन सल्फेट इंजेक्शनची अवैध विक्री, प्रयाग चिखलीतील विक्रेत्यास अटक
कोल्हापूर : शरीर पिळदार आणि आकर्षक बनविण्यासाठी आरोग्यास घातक मेफेनटेरमाइन सल्फेट इंजेक्शनची बेकायेदशीर विक्री करणारा अमोल अशोक पाटील (वय ३४, रा. प्रयाग चिखली, ता. करवीर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून ६३ हजार रुपये किमतीच्या ६३ बाटल्या जप्त केल्या. ही कारवाई शनिवारी (दि. २१) सायंकाळी पन्हाळा रोडवर रजपूतवाडीच्या हद्दीत एका लॉजजवळ सापळा रचून केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीममध्ये व्यायाम करणाऱ्या तरुणांना कमी वेळेत त्यांचे शरीर पिळदार आणि आकर्षक बनविण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधित औषधांची विक्री होत असल्याची माहिती अंमलदार सत्यजीत तानुगडे यांना मिळाली होती. संशयित विक्रेता रजपूतवाडीजवळ येणार असल्याची माहिती मिळताच उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी सापळा रचून अमोल पाटील याला अटक केली.
अंगझडतीत त्याच्याकडे मेफेनटेरमाइन सल्फेट या प्रतिबंधित औषधाच्या बाटल्या मिळाल्या. जीममध्ये व्यायाम करणारे तरुण, पैलवान, शरीरसौष्टवपटू, बॉक्सर अशा खेळाडूंना याची विक्री करीत असल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ६३ हजार रुपये किमतीच्या बाटल्या जप्त केल्या.
याबाबत पाटील याच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. उपनिरीक्षक गळवे यांच्यासह अंमलदार तानुगडे, वैभव पाटील, महेंद्र कोरवी, परशुराम गुजरे, संतोष बरगे, शिवानंद मठपती, विशाल खराडे, प्रदीप पाटील, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
दिल्लीतून कुरिअरने मागवले
अटकेतील अमोल याने काही वर्ष पैलवानकी केली आहे. त्यामुळे त्याला उत्तेजक औषधे आणि स्टेरॉइडची माहिती आहे. दिल्लीतील अजित कुमार या तरुणाकडून कुरिअरने औषधे मागवल्याचे त्याचे पोलिसांना सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून विक्री करीत असल्याची कबुली त्याने दिली. अजित कुमार याच्याकडून औषधे मागवणारे आणखी काही तरुण जिल्ह्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यांचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
..तर वापर जीवघेणा ठरेल
मेफेनटेरमाइनच्या वापराने हृदय, मज्जा संस्था आणि मूत्रपिंडावर परिणाम होतो. मांसपेशी फुगतात. रक्तदाब वाढून इतर विकार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्याचा वापर करणे जीवघेणे ठरू शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले.