शक्तिपीठ झाला, तर महापुराचे पाणी बिंदू चौकापर्यंत, राजू शेट्टी यांची भीती; रद्दसाठी अंबाबाईला घातले साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 11:22 IST2025-07-12T11:21:58+5:302025-07-12T11:22:27+5:30

कोल्हापुरात विरोध नाही, असे भासविण्यासाठी काही जण मुंबईत समर्थनार्थ बैठक घेत आहेत

If Shaktipeeth is built flood water will reach Bindu Chowk Raju Shetty fears | शक्तिपीठ झाला, तर महापुराचे पाणी बिंदू चौकापर्यंत, राजू शेट्टी यांची भीती; रद्दसाठी अंबाबाईला घातले साकडे

शक्तिपीठ झाला, तर महापुराचे पाणी बिंदू चौकापर्यंत, राजू शेट्टी यांची भीती; रद्दसाठी अंबाबाईला घातले साकडे

कोल्हापूर : शक्तिपीठ हटाव, कोल्हापूरला महापुरापासून बचाव, शक्तिपीठ रद्द झालाच पाहिजे, जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, अशा घोषणा शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी देऊन येथील अंबाबाई मंदिर परिसर दणाणून सोडला. आई अंबाबाई शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी दे, उदं गं आई उदं, असा गजर आणि गणपतीची आरती करून करवीर निवासिनी अंबाबाईला साकडे घातले.

शक्तिपीठ महामार्ग करताना पुन्हा भराव टाकावा लागणार आहे. असे झाले, तर बिंदू चौकापर्यंत महापुराचे पाणी येईल. निम्मे कोल्हापूर महापुरात जाईल, अशी भीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी माजी खासदार शेट्टी म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर, सांगलीसह बारा जिल्ह्यांतील जनतेचा विरोध आहे. मात्र, कोल्हापुरात विरोध नाही, असे भासविण्यासाठी काही जण मुंबईत समर्थनार्थ बैठक घेत आहेत. ते शक्तिपीठला समर्थन करून कोल्हापूरच्या महापुराची स्थिती आणखी गंभीर करणार आहेत. सध्याचा महामार्ग करताना मातीचा भराव टाकल्याने २०१९ साली जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी आले होते. शक्तिपीठ महामार्ग करताना पुन्हा भराव टाकावा लागणार आहे.

वाचा-  शक्तिपीठसाठी शेतकऱ्यांची संमतीच, सातबाराही जमा; आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती 

असे झाले, तर बिंदू चौकापर्यंत महापुराचे पाणी येईल. निम्मे कोल्हापूर महापुरात जाईल. शक्तिपीठला उपमार्ग म्हणून कणेरीमठ ते जोतिबा असा एक नवा रस्ता करण्याचे नियोजन आहे. या रस्त्यामुळे ऊस शेतीचे मोठे नुकसान होणार आहेत. भोगावती, कासारी नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलासाठी भरावा टाकला, तर पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात तुंबून राहणार आहे. यावेळी उद्धवसेनेचे विजय देवणे, रविकिरण इंगवले, सचिन चव्हाण, राजेश लाटकर, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, अजित पोवार आदी सहभागी झाले होते.

बालिश मागणी..

राज्य सरकार नियोजित महामार्ग करणार आहे, म्हणून कर्नाटकातून चंदगडमार्गे महामार्ग करता येत नाही. तरीही कोणाला तरी खूश करण्यासाठी अज्ञानातून चुकीची आणि बालिश मागणी केली जात आहे, अशी टीका माजी खासदार शेट्टी यांनी केली.

Web Title: If Shaktipeeth is built flood water will reach Bindu Chowk Raju Shetty fears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.