'महादेवी' नांदणीत आली नाही तर राज्य पुन्हा रस्त्यावर, मनोज जरांगे-पाटील यांनी दिला इशारा -video
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 13:55 IST2025-08-08T13:53:33+5:302025-08-08T13:55:03+5:30
जनभावनांचा उद्रेक संपूर्ण देशाने पाहिला

'महादेवी' नांदणीत आली नाही तर राज्य पुन्हा रस्त्यावर, मनोज जरांगे-पाटील यांनी दिला इशारा -video
जयसिंगपूर : अनेक वर्षांची परंपरा असणाऱ्या नांदणी मठाच्या धार्मिक प्रथा महादेवी हत्तीणीच्या माध्यमातून राखण्यात आल्या आहेत. जनभावनांचा उद्रेक संपूर्ण देशाने पाहिला आहे. दोन दिवसांत झालेल्या घडामोडीमुळे काही सकारात्मक चर्चा सुरू आहेत. महादेवी नांदणीत परत आली नाही, तर राज्य पुन्हा रस्त्यावर उतरेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.
नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात गुरुवारी सायंकाळी मनोज जरांगे यांनी भेट दिली. मठाच्या धार्मिक परंपरेची त्यांनी माहिती घेतली. यावेळी स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी त्यांना महादेवीचे असणारे स्थान याबाबत माहिती दिली. त्यानंतर महास्वामी यांनी जरांगे-पाटील यांना आशीर्वाद दिले. जनभावनेचा आदर येणाऱ्या काळात निश्चित होणार आहे. जनतेचा निश्चित नक्की विजय होणार आहे. त्यामुळे महादेवी पुन्हा नांदणीला परतणार यात शंका नाही.
महादेवीला गुजरातहून पुन्हा आणण्यासाठी सुरू असलेल्या लोकचळवळीला आपला पाठिंबा असून मठाबरोबर राहू, अशी ग्वाहीही जरांगे-पाटील यांनी दिली. यावेळी स्वस्तिश्री धर्मसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, माजी आमदार उल्हास पाटील, सागर शंभुशेटे, रामगोंड पाटील, चंद्रकांत धुळासावंत, विजय माणगावे, विश्व माणगावे, डॉ. सागर पाटील, आण्णासाहेब तर्वे, सागर धनवडे, भूषण गंगावणे, दीपक पाटील यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.