सीसीटीव्ही बंद केल्यास पुजाऱ्यांवर फौजदारी दाखल करु : महेश जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 01:37 PM2017-10-27T13:37:55+5:302017-10-27T13:45:10+5:30

सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास अडथळा निर्माण केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करू त्यानंतर पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही असा सज्जड इशारा देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी शुक्रवारी दिला आहे.

If the CCTV is shut down, file a criminal case against the accused: Mahesh Jadhav | सीसीटीव्ही बंद केल्यास पुजाऱ्यांवर फौजदारी दाखल करु : महेश जाधव

सीसीटीव्ही बंद केल्यास पुजाऱ्यांवर फौजदारी दाखल करु : महेश जाधव

Next
ठळक मुद्देदेवस्थान समितीचे अध्यक्ष जाधव यांनी दिला पुजाऱ्यांना इशारा...तर पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही

कोल्हापूर, दि. २७ : सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास अडथळा निर्माण केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करू त्यानंतर पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही असा सज्जड इशारा देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी शुक्रवारी दिला आहे.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यातील सीसीटीव्ही कॅमेरे मंदिरातील पुजाऱ्यांनी परस्पर बंद केल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि पुजाऱ्यांमधील वादावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना पुजाऱ्याना इशारा दिला.

कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात देवीच्या मूर्ती संवर्धनासाठी व आतील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी देवस्थान समितीने चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून, ते गुरुवारपासून कार्यान्वित झाले आहेत, मात्र गाभाऱ्यात सीसीटीव्ही बसवताच पुजाºयांनी हे चारही कॅमेरे परस्पर बंद केल्याने गुरुवारी रात्री गोंधळ माजला.

हे कॅमेरे सुरु करण्याचे आणि बंद करण्याचे अधिकार देवस्थान समितीला असल्यामुळे पुजाऱ्याना या कॅमेऱ्याबाबत आक्षेप घेता येणार नाही, अशी भूमिका देवस्थान समितीने घेतल्याने हा वाद पोलिस ठाण्यात पोहोचला.

या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे गाभाऱ्यातील हालचालींवर देवस्थानच्या कार्यालयासह जुना राजवाडा पोलीस ठाण्यामधूनही लक्ष ठेवता येणार आहे. कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराप्रमाणे देवीच्या गाभाऱ्यातही सीसीटीव्ही लावले जावेत, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून जोर धरत होती. त्यासाठी विविध संस्था-संघटनांनी आंदोलनेही केली होती.

मंदिरातील गाभाऱ्याची नियमित देखभाल होते की नाही, आर्द्रतेचे नियम पाळले जात आहेत की नाही यासह विविध गोष्टींबाबत सीसीटीव्ही लावले जावेत, अशी मागणी जोर धरत होती. खुद्द पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही या गोष्टीचा पाठपुरावा करून सीसीटीव्हीबाबत देवस्थान समिती व पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते.


पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून नवरात्रौत्सवाआधी गाभाऱ्यामध्ये सीसीटीव्ही लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती; परंतु तांत्रिक कारणांस्तव गाभाऱ्यामध्ये पूर्ण क्षमतेने कॅमेरे बसविण्यात आले नव्हते.

पहिल्या टप्प्यामध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते; पण ते पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत अथवा त्यांचे प्रक्षेपण जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये पाहता येत नाही, असा आरोप काही भक्त समित्यांकडून केला जात होता.

या दोन कॅमेऱ्यासह आणखी दोन कॅमेरे गुरुवारी देवस्थान समितीकडून गाभाऱ्यामध्ये बसविण्यात आले. पूर्वीच्या कॅमेऱ्यातील तांत्रिक दोषांचेही निवारण करण्यात आले असून, एकूण चार सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी कार्यान्वित झाले आहेत.


अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनाच्या मुख्य उद्देशाने हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गाभाºयामध्ये आर्द्रतेचे नियम पाळले जात आहेत का?, मूर्तीची व गाभाऱ्याची स्वच्छता नियमित ठेवली जात आहे की नाही, यावर लक्ष राहावे यासाठीच कॅमेरे बसविल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: If the CCTV is shut down, file a criminal case against the accused: Mahesh Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.