Kolhapur- Gokul Sabha: मी शब्दाला जागले, पण भावाने फसविले - शौमिका महाडिक; नविद मुश्रीफ म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 12:19 IST2025-09-10T12:18:41+5:302025-09-10T12:19:20+5:30
मुश्रीफ-महाडिक यांचे कार्यकर्ते आमने-सामने

Kolhapur- Gokul Sabha: मी शब्दाला जागले, पण भावाने फसविले - शौमिका महाडिक; नविद मुश्रीफ म्हणाले..
कोल्हापूर : महायुतीचा अध्यक्ष असल्याने आम्ही कोणत्या प्रकारचा गोंधळ करणार नाही, त्यांना सहकार्य करण्याचा शब्द आम्ही दिला होता. त्याचे पालन आम्ही केले, पण भावाने (नविद मुश्रीफ) यांनी फसविल्याचा आरोप करीत संचालक वाढीचा मुद्दा जरी रेटला असला तरी अजून बरीच प्रक्रिया आहे, त्यावेळी बघू, असा इशाराही संचालिका शौमिका महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
शौमिका महाडिक म्हणाल्या, सभा दोन तास चालली, त्यातील एक तास अध्यक्षांनी, तर दुसरा तास कार्यकारी संचालकांनी घेतला. सभासदांचे प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत. वर्षातून एकवेळ सभासद प्रश्न घेऊन येतात, त्यांना माईक देणे अपेक्षित होते, पण तो दिला नाही.
वाचा: मुश्रीफ-सतेज पाटील गट्टी घट्ट, गोकुळ'च्या सभेत निवडणुकीतील संभाव्य युतीत पडला मिठाचा खडा
कागलकरांनीच गालबोट लावले
आम्ही सभा शांततेत पार पडावी, यासाठी प्रयत्न केला. पण, सुरुवातीपासून घोषणाबाजी कोण देत होते. ‘गोकुळ’मध्ये सभासदांना कसे जुमानले जात नाही, हे महाराष्ट्राने पाहिले आहे. हुल्लडबाजी करून कागलकरांनीच गालबोट लावल्याचे महाडिक यांनी सांगितले.
भावाने सन्मान करूनच सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली - नविद मुश्रीफ
कोल्हापूर : भावाने सन्मान करूनच व्यासपीठावर त्यांना बोलावले होते. तरीही त्या सभासदांमध्ये बसल्या. तरीही त्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे सविस्तर दिलेली आहेत. त्यांच्या आणखी काही शंका असतील तर आगामी काळात त्यांचेही निरसन केले जाईल, अशी माहिती अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी दिली.
वाचा: म्हैस वासाच्या दुधाला १२ तर गायीला ८ रुपये देणार, नविद मुश्रीफ यांची घोषणा
अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, गेल्या चार वर्षांत सभेला गोंधळ व्हायचा. कामकाजासह सभासदांच्या प्रश्नांवर चर्चा व्हायची नाही. मात्र, यावर्षी सभा शांततेत पार पडली, त्याबद्दल दूध उत्पादकांचे आभार मानतो.
मुश्रीफ-महाडिक यांचे कार्यकर्ते आमने-सामने
यापूर्वीच्या सभेत शौमिका महाडिक व आमदार सतेज पाटील यांचे समर्थक आमने-सामने यायचे; पण या सभेला मंत्री हसन मुश्रीफ व महाडिक समर्थकांमध्ये घोषणा रंगल्या.