इस्टेट विभागातील कोण किती पैसे खातेय याची यादीच माझ्याकडे; चक्क महापौरांनीच दिली सभागृहात माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 17:04 IST2026-03-19T17:03:51+5:302026-03-19T17:04:11+5:30
गवत मंडईतील दुकानगाळ्यांचा विषय, इस्टेट विभागाच्या चौकशीचे आदेश

इस्टेट विभागातील कोण किती पैसे खातेय याची यादीच माझ्याकडे; चक्क महापौरांनीच दिली सभागृहात माहिती
कोल्हापूर : शाहूपुरी गवत मंडईतील दफनभूमीला लागून पंधरा गाळे बेकायदेशी बांधले, २२ गाळ्यांची मोठ्या प्रमाणात जागा व्यापून टाकली आहे याकडे लक्ष वेधतानाच कोणाच्या आशीर्वादाने हे सुरू आहे. इस्टेट विभाग करतंय तरी काय? असा सवाल बुधवारी झालेल्या महापालिका सभेत विचारला गेला.
दरम्यान, पाणीपट्टी, घरफाळा, अग्निशमन सेवा, घनकचरा सेवा शुल्क यांचे दर वाढविण्याचे प्रस्ताव नामंजूर करण्यात आले तर बांधकाम विभागाकडील ठेकेदार नोंदणी, नूतनीकरण, श्रेणीवाढकरिता शुल्कवाढ करण्याचा प्रस्ताव उपसूचनेसह मंजूर करण्यात आला. काही प्रस्ताव उपसूचनेसह मंजूर करण्यात आले असले तरी सभागृहासह महापौर रुपाराणी निकम यांनी या वर्षी तरी कोणतीही करवाढ केली जाणार नसल्याचे प्रशासनाला ठासून सांगितले.
सभेत घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट विभागावर जोरदार चर्चा झाली. घरफाळ्याची चुकीची बिले दिले गेले. अनेकांच्या बिलात दंड, व्याज आकारले गेले असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत, याकडे शारंगधर देशमुख यांनी लक्ष वेधले. अर्जुन माने यांनी आगाऊ कर भरणाऱ्यांनाही दोन दोन लाखांची बिले आल्याचे सांगितले. यावेळी राजेश लाटकर, रत्नेश शिरोळकर, प्रतिज्ञा उत्तुरे, विजयेंद्र माने, दीपा ठाणेकर, विशाल शिराळे यांनी चर्चेत भाग घेतला. तर पाणीपुरवठ्याकडील गळतीबाबत वैभव माने, नियाज खान, मंगला साळोखे, माधुरी नकाते, विजयसिंह देसाई, अभिजित खतकर, पल्लवी देसाई यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
इस्टेट विभागाचा भंडाफोड करताना अमर समर्थ यांनी शाहुपूरी गवत मंडई लगतच्या दफनभूमीला लागून १५ दुकानगाळे बेकायदेशीर बांधले गेले आहेत. अस्तित्वात असणाऱ्या २२ दुकानगाळेधारकांनी मोठ्या प्रमाणात जागा व्यापली आहे. कोणाच्या आशीर्वादाने हे अतिक्रमण झाले आहे. इस्टेट विभाग काय करतंय अशी विचारणाच त्यांनी केली. यावेळी त्यांनी अतिक्रमणाची काही छायाचित्रेही महापौरांकडे सादर केली.
इस्टेट विभागाच्या चौकशीचे आदेश
इस्टेट विभागाच्या चर्चेवेळी बोलताना महापौर निकम यांनी तर माझ्याकडे कोण किती रुपये घेतात याची नावानिशी अधिकाऱ्यांची नावे आहे, असे सांगून त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचा इशारा दिला. आयुक्त मंजूलक्ष्मी यांनी या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.