Kolhapur- Gokul Dudh Sangh: दोन महिन्यांपूर्वीच मुश्रीफांकडे राजीनामा द्यायला गेला होतो, अरुण डोंगळेंनी ऐकवली इनसाईड स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 11:47 IST2025-05-23T11:47:27+5:302025-05-23T11:47:55+5:30
कोल्हापूर : ‘दोन महिन्यांपूर्वी काही वैचारिक मतभेद झाल्याने मीच कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्याकडे जाऊन राजीनामा देतो असे सांगायला गेलो ...

Kolhapur- Gokul Dudh Sangh: दोन महिन्यांपूर्वीच मुश्रीफांकडे राजीनामा द्यायला गेला होतो, अरुण डोंगळेंनी ऐकवली इनसाईड स्टोरी
कोल्हापूर : ‘दोन महिन्यांपूर्वी काही वैचारिक मतभेद झाल्याने मीच कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्याकडे जाऊन राजीनामा देतो असे सांगायला गेलो होतो; मात्र, त्यांनीच मला राजीनामा देऊ दिला नाही,’ या शब्दांत ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजीनामानाट्याची इनसाइड स्टोरी पत्रकारांना ऐकवली.
संचालक मंडळाने डोंगळे यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर काहीसे तणावमुक्त झालेल्या डोंगळे यांनी मुंबई, कोल्हापूर, चंदगड आणि कागलमध्ये ‘गोकुळ’संदर्भात झालेल्या घडामोडींवरील मनातील आक्रंदन पत्रकारांसमोर उलगडले.
डोंगळे म्हणाले, ‘मला अध्यक्षपदासाठी मुदतवाढ मिळावी यासाठी सह्याद्री अतिथिगृहावर अजित पवार यांना अडीच महिन्यांपूर्वी भेटलो. तेथे मुश्रीफही उपस्थित होते. पवार यांनी यासाठी कोणाला बोलावे लागेल असे विचारताच मी मुश्रीफ यांच्याकडे बोट दाखवले. मात्र, त्यांनी ‘अजून दोन महिने अवकाश आहेत, पुढे बघू,’ म्हणत मुदतवाढीचा विषय पुढे ढकलला.
मात्र, काहीच दिवसांनी सहकाऱ्यांबरोबर माझे वैचारिक मतभेद झाल्याने अध्यक्षपदाचा राजीनामा देतो असे सांगण्यासाठी कागलमध्ये मुश्रीफ यांच्याकडे गेलो होतो. मात्र, त्यांनी एका झटक्यात ‘तू राजीनामा देऊ नको, अजून दोन महिने बाकी आहेत,’ असे ठणकावून सांगितल्याने मी राजीनामा दिला नसल्याचा गौप्यस्फोट डोंगळे यांनी केला.
होय, मी शिंदेसेनेच्या वाटेवर
मी शिंदेसेनेच्या वाटेवर असून मी व मुलगा अभिषेक एकाच पक्षात राहावे यासाठी माझा प्रयत्न आहे. चार दिवसांपूर्वी चंदगडमध्ये झालेल्या एका लग्नसोहळ्यावेळी माझा हा निर्णय मी भैय्या माने यांच्यामार्फत मुश्रीफ यांच्या कानांवर घातला. मात्र, त्यांनी ‘मुलगा चांगलं काम करतोय, त्याला जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊ, कशाला वेगळा निर्णय घेताय?’ अशी मनधरणी केली. पण, मी शिंदेसेनेच्या वाटेवर आहे हे खरे आहे, असे स्पष्टीकरण डोंगळे यांनी दिले.
दोन जागांवर मदत करा; बक्षीस देऊ
विधानसभेला प्रकाश आबिटकर व चंद्रदीप नरके यांना मदत करा, त्या बदल्यात बक्षीस देऊ, असा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. आता हे बक्षीस कोणते असेल हे मला माहीत नसल्याचे डोंगळे यांनी सांगितले.
फडणवीस, पवार राजी.. पण शिंदे यांचे मौन
मी राजीनामा देत असल्याचे सांगितल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला होकार दर्शविला. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटपर्यंत याबाबत निर्णय कळवला नसल्याचे डोंगळे म्हणाले.