कोल्हापूर: बोरवडे येथे भरधाव ट्रकची दुचाकीला समोरुन धडक, पती-पत्नी जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 18:10 IST2022-06-03T18:06:08+5:302022-06-03T18:10:16+5:30
देवदर्शन घेऊन घरी परताना काळाचा घाला.

कोल्हापूर: बोरवडे येथे भरधाव ट्रकची दुचाकीला समोरुन धडक, पती-पत्नी जागीच ठार
बोरवडे : भरधाव वेगाने चुकिच्या दिशेने येणाऱ्या दहा चाकी ट्रकने दुचाकीला समोरुन जोराची धडक दिली. या भीषण अपघातात देवदर्शन घेवून घरी परतणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. बोरवडे (ता.कागल) येथील फाट्या जवळ आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.
भैरवनाथ आप्पासो पाटील (वय अंदाजे ४५) व त्यांची पत्नी पुनम (३८, रा.कोडणी, ता. निपाणी) अशी मृतांची नावे आहेत. मुरगूड व राधानगरी पोलिसांनी पाठलाग करीत ट्रक चालक विठ्ठल शिवाप्पा झिपरे (२५, रा.खडकलाट) याला खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी) येथे पकडले.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, भैरवनाथ पाटील पत्नी पुनम सोबत दुर्गमानवड येथील विठ्ठलाई देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेवून ते गावी कोढणीकडे निघाले होते. याचदरम्यान राधानगरीकडे निघालेल्या दहाचाकी ट्रकने (के.ए.२२ सी.१९८१) चुकिच्या दिशेने येत पाटील यांच्या दुचाकी क्रमांक (के.ए.२३ ई.डी.५५३) ला समोरुन जोराची धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वारांच्या मृतदेहाचे तुकडे झाले.
अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेदरम्यान मुरगूड पोलीस मुधाळ तिट्यावर कार्यरत होते. अपघाताची माहिती मिळताच मुरगूड पोलिसांनी ट्रकचा पाठलाग केला. राधानगरी पोलिसांच्या सहकार्याने खिंडी व्हरवडे येथे ट्रक चालकाला पकडून राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले.
अधिक तपास मुरगूड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली संदिप ढेकळे, सचिन निकाडे, रमेश शेंडगे, राम पाडळकर , स्वप्नील मोरे, हिंदुराव परीट करीत आहेत. मृत भैरवनाथ पाटील यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.