इंदुमती गणेशकोल्हापूर : गणेशोत्सव हा धार्मिक, पावित्र्य असलेला सण आहे. मोठ्या साऊंड सिस्टिमवर वाजणारी गाणी, सामाजिक संकेतांना विसरून बेभान होऊन नाचणारी पोरं, उत्सवाच्या नावाखाली होणारी दांडगाई, बिभत्सता याला फाटा देऊन हा सण विधायकतेने साजरा व्हावा यादृष्टीने राज्य महोत्सवाचा दर्जा मिळणे महत्त्वाचे आहे. उत्सवाचे नियम, निकष ठरवून शासनाने विधायक उपक्रमांना प्राेत्साहन द्यावे. स्वराज्यासाठी सुरू झालेला गणेशोत्सव आता सुराज्याकडे नेणारा ठरावा, अशी अपेक्षा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी व या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली.राज्य शासनाने गणेशाेत्सवाला राज्य महोत्सव जाहीर केले आहे. यामुळे महाराष्ट्राला काय फायदा होणार आहे, शासन स्वत:च सगळे महोत्सव करणार की मंडळांना सहभागी करणार, राज्य उत्सव म्हणजे नेमके काय करणार, सणाचे पावित्र्य जपण्यासाठी काही प्रयत्न होणार का याबाबत लोकमतने जाणकारांना बोलते केले.
गणेशोत्सवाची दखल घेतली गेली याचा आनंद आहेच, पण हे करताना शासनाने त्याचा उद्देश, धोरण आणि नियमावली ठरवली पाहिजे. हा महोत्सव शासन त्यांच्या पातळीवर साजरा करणार की राज्यातील सार्वजनिक मंडळांना त्यात सहभागी करून घेणार, त्यांना विधायक कामांसाठी प्रोत्साहन देणार का याचा विचार करून महोत्सवाची रूपरेषा ठरवावी. - गजानन यादव, लेटेस्ट तरुण मंडळ
मोठ्या आवाजाचे साऊंड सिस्टीम, चुकीची गाणी वाजवणे, बेभान होऊन नाचणारे तरुण यामुळे सणातील धार्मिकता, पावित्र्य, संस्कृतीला गालबोट लागते. राज्य महोत्सव म्हणून या सणाला पावित्र्य जपणे हा पहिला निकष असावा. प्रबोधन, निसर्ग संवर्धन, शासनाचे जनता उपयोगी योजना, मदत गरजूंपर्यंत पोहोचवून देशातला हा आदर्श राज्य उत्सव म्हणून नावारूपास यावा. - राजू मेवेकरी, महालक्ष्मी भक्त मंडळ
राज्य उत्सवाचा दर्जा देताना शासनाने कोणते निकष लावलेत हे अजून कळत नाही. पण यानिमित्ताने महाराष्ट्राची संस्कृती जगभरात पोहोचेल अशी अपेक्षा आहे. सध्या तरुणाईमधील बेरोजगारी हा महत्त्वाचा प्रश्न असून या उत्सवाद्वारे रोजगार उपलब्ध होतील का याचा विचार व्हावा. - अजित सासणे, संभाजीनगर तरुण मंडळ
मंडळांमध्ये, तरुणाईमध्ये असलेली मोठी ताकद गणेशोत्सवामुळे एकवटली जाते. त्यांना एका छताखाली आणून विधायकतेकडे वळण्यासाठी याचा उपयोग व्हावा. बिभत्सता टाळून, पर्यावरणाचे रक्षण करत हा सण साजरा व्हावा यासाठी शासनाने मंडळांना प्रोत्साहन द्यावे. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा यातून वाढली पाहिजे. - प्रमोद पाटील, हील रायडर्स
गणेशोत्सव हे धार्मिक, श्रद्धेचे व्रत आहे. बंगालमध्ये ज्याप्रमाणे धार्मिक रितीरिवाज पाळून नवरात्रोत्सवात दुर्गा पूजा होते, पावित्र्य जपत मिरवणुका निघतात त्याप्रमाणे महाराष्ट्राचा गणेशोत्सव असावा. स्वराज्यासाठी सुरू झालेला गणेशाेत्सव सुराज्याकडे नेणारा व्हावा ही यानिमित्ताने अपेक्षा आहे. - प्रसन्न मालेकर, मंदिर व मूर्ती अभ्यासक