राज्यात ५० लाख मतदार वाढले कसे, खासदार विशाल पाटील यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:15 IST2025-01-27T12:14:34+5:302025-01-27T12:15:11+5:30
निवडणूक आयुक्त हे भाजपचे कार्यकर्ते आहेत का?

राज्यात ५० लाख मतदार वाढले कसे, खासदार विशाल पाटील यांचा सवाल
कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पारदर्शीपणे झाल्या नसून लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या सहा महिन्यांत राज्यात ५० लाख मतदार वाढले कसे, असा सवाल सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केला.
विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या कृत्याविरोधात, लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेसच्या वतीने स्टेशन रोडवर निदर्शने करण्यात आली. यानंतर खासदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते.
विशाल पाटील म्हणाले, २०१९ ची व २०२४ ची निवडणूक या पाच वर्षांत ५ लाख मतदार वाढले होते. मात्र, २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूक कालावधीत ५० लाख मतदार वाढले कसे, याची माहिती आयोगाने द्यावी. विधानसभा मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेनंतर वाढलेली ७६ लाख मते संशयास्पद आहेत. ही मते कशी वाढली, याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकलेला नाही.
गाफील राहिलो त्यामुळे पराभव
निवडणुकीच्या कालावधीत भाजप मतदारवाढीसाठी प्रयत्न करत होते. यावेळी काँग्रेसने दक्ष राहणे गरजेचे होते. मात्र, त्या काळात काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. शिवाय लोकसभा निवडणुकीच्या यशामुळे विधानसभा निवडणुकीत आम्ही गाफील राहिल्याने विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याची कबुलीही खासदार पाटील यांनी दिली.
आयुक्त भाजप कार्यकर्ते आहेत का?
सध्याचे निवडणूक आयुक्त हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. ईव्हीएमविरोधात पुरावे गोळा करत असून त्यानंतरही ही लढाई लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल वेगळा असेल
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस ताकतीने उतरणार असून, हा निकाल काँग्रेसच्या बाजूने असेल, असा विश्वासही विशाल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.