लोकसभेवेळी शक्तीपीठला विरोध करणाऱ्यांचे आता समर्थन कसे ?, खासदार शाहू छत्रपती यांची विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 12:04 IST2025-03-10T12:03:25+5:302025-03-10T12:04:25+5:30
विकासात राजकारण नको, शेतकरी हिताचाही विचार व्हावा

लोकसभेवेळी शक्तीपीठला विरोध करणाऱ्यांचे आता समर्थन कसे ?, खासदार शाहू छत्रपती यांची विचारणा
कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गाला लोकसभा निवडणुकीत विरोध करणारे आता अचानकपणे समर्थन करीत आहेत. इतका बदल कसा झाला ? शक्तीपीठचे फायदे काय, याचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे, असे मत खासदार शाहू छत्रपती यांनी रविवारी मांडले. विकासात राजकारण नको, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.
कोल्हापूर फर्स्ट फोरमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, विकास करताना शेतकरी हित, त्यांच्या मागणीचाही विचार झाला पाहिजे. येथे खंडपीठ व्हावे, विभागीय आयुक्तालय व्हावे, अशी मागणी आहे. पण, कोल्हापुरातील पोलिस आयुक्तालय येथून हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला आमचा विरोध आहे. हद्दवाढ सर्वांना विश्वासात घेऊन झाली पाहिजे, यासाठी आजी, माजी आमदार, सरपंच यांची व्यापक बैठक बोलवावी.
शाहू मिलच्या जागेचा विकास करण्यासाठी त्यावरील कर्ज शासनाने माफ केले पाहिजे. यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुढाकार घ्यावा. पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. जोपर्यंत या नदीतील पाणी पिण्याच्या योग्यतेचे होईल, त्याच वेळी प्रदूषण मुक्त नदी होईल, असे म्हणता येईल. म्हणून, नदी प्रदूषणासाठी भरीव निधीची गरज आहे.
विमानतळ चांगले, पण दिवसात तीनच विमान..
नुकतेच ग्वाल्हेरला जाऊन आलो. तेथील विमानतळाचा विकास अतिशय चांगला झाला आहे, पण दिवसभरात केवळ तीनच विमाने उड्डाण करतात, असा खिस्सा खासदार छत्रपती यांनी स्पष्ट केला. कोल्हापूरच्या विमान तिकिटाचे दर कमी झाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
एमएच झिरो नाइन विरुद्ध एकावन्न
कोल्हापूर फर्स्ट फोरममध्ये शेतकरी प्रतिनिधी का नाही, अशी विचारणा खासदार छत्रपती यांनी विचारणा केली. यावर आमदार राहुल आवाडे यांनी वस्त्रोद्योगचेही कोणी नाही. एमएच झेरो नाइन (कोल्हापूर) विरुद्ध एमएच एकावन्न (इचलकरंजी) असे झाले आहे, असा उपरोधिक टोला आवाडे यांनी लगावला. खासदार छत्रपती यांनी असे काही नाही, माझी शेवटची गाडी एमएच एकावन्न आहे, असे स्पष्ट केले.
१४ संघटना एकत्र आणि ११ प्रमुख विषयांची मांडणी
कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी १४ नामांकित संघटना एकत्र येऊन कोल्हापूर फर्स्ट फोरम सुरू केली आहे. या फोरमच्या माध्यमातून हद्दवाढ, मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच, शंभर एकर क्षेत्रावर आधुनिक आयटी पार्क विकसित करणे असे ११ विकासाचे विषय हाती घेऊन लोकप्रतिनिधींतर्फे पाठपुरावा करण्यात येणार आहे.
दाजीपूर प्राधिकरण
सिमेंटच्या जंगलातून खऱ्या जंगलाकडे लोक मोठ्या संख्येने वळत आहेत. म्हणून विधानसभा निवडणुकीत दाजीपूर विकास प्राधिकरण हाती घेतले होते; पण त्याला राजकीय विरोध होईल म्हणून पुढे काही केले नाही. पण आता दाजीपूर परिसराचा विकास करण्यासाठी प्राधिकरण करणार असल्याची घोषणा पालकमंत्री आबिटकर यांनी केली.
आधी कोठे होतो, आता कोठे?
मी आधी कोठे होतो. कोठे गेलो आणि आता कोठे आहे याकडे पाहिले तर गेल्या काही वर्षांत राजकीय उलथापालथी झाल्या. सत्ता अस्थिर होते; पण आता देश, राज्यात सत्ता स्थीर सरकार आहे. त्यामुळे विकास कामांना गती येईल, असे आश्वासन आबिटकर यांनी दिले.