लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ७४ शेतकरी कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून शेतीमाल खरेदी-विक्री केली जातेच, त्याचबरोबर शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात खतांचा पुरवठाही केला जातो. साधारणत: या कंपन्यांची वार्षिक शंभर कोटींपेक्षा अधिक उलाढाल होते.
शेतीमालाला मार्केट मिळून चांगला दर मिळावा, यासाठी केंद्र सरकारने शेतकरी कंपन्यांची संकल्पना आणली. शेतकऱ्यांनी एकत्रित येत कंपनीची स्थापना करायची, त्याच्या माध्यमातून शेतीमाल खरेदी-विक्री सुरू राहते. काेल्हापूर जिल्ह्यात ७४ शेतकरी कंपन्या कार्यरत आहेत. एका कंपनीकडे सरासरी ७०० शेतकरी संलग्न आहे. सोयाबीन, गूळ, भाजीपाला खरेदी-विक्रीचे काम या कंपन्या करीत आहेत. काही कंपन्या राईस मील व्यवसायात कार्यरत आहेत. एका कंपनीची किमान ५० लाख तर कमाल ५ कोटींपर्यंत उलाढाल आहे. लॉकडाऊनच्या काळातही या कंपन्यांनी शेतकऱ्यांना आधार दिला. शेतकऱ्यांचा संपूर्ण माल खरेदी करून त्याची विक्री करून चांगला नफाही कमावला आहे.
गुळाचा दूधगंगा ब्रॅन्ड
राधानगरी तालुक्यातील दूधगंगा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी भाजीपाल्याची खरेदी-विक्री करते. गुळाचे उत्पादन करून ‘दूधगंगा ब्रॅन्ड’ खाली त्याची विक्रीही केली जाते.
‘फॅमिली फार्मींग्ज’ची पाच कोटींची उलाढाल
पारगाव (ता. हातकणंगले) येथील फॅमिली फार्मींग्ज कंपनी केळी खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून विक्री करते. त्याचबरोबर सवलतीच्या दरात निविष्ठा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाते. या कंपनीची वार्षिक पाच कोटींची उलाढाल आहे.
- राजाराम लोंढे