कोल्हापुरात हिंदुत्ववाद्यांचे औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरीवर हातोडा मार आंदोलन, पोलिसांसोबत झटापट
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: March 17, 2025 17:02 IST2025-03-17T17:00:24+5:302025-03-17T17:02:06+5:30
कोल्हापूर : भारतात क्रुरकर्मा शासक औरंगजेबाची कबर असणे हे गुलामी आणि यातनांचे प्रतीक आहे. त्यामुळे शासनाने छत्रपती संभाजी नगर ...

कोल्हापुरात हिंदुत्ववाद्यांचे औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरीवर हातोडा मार आंदोलन, पोलिसांसोबत झटापट
कोल्हापूर : भारतात क्रुरकर्मा शासक औरंगजेबाची कबर असणे हे गुलामी आणि यातनांचे प्रतीक आहे. त्यामुळे शासनाने छत्रपती संभाजी नगर येथे असलेली त्याची कबर तातडीने हटवावी या मागणीसाठी आज, सोमवारी हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. प्रतिकात्मक कबरीवर हातोडा मारण्याच्या या आंदोलनाला पोलिसांनी मज्जाव केल्याने आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट झाली.
कुंदन पाटील, निलेश शिंदे यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना याबाबतचे निवेदन दिले. यात देशभरातील शिवशंभुप्रेमी हिंदुत्ववादी कार्यकर्ते कारसेवा करुन कबर बाजुला करतील असा इशारा बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी खाजगी वाहनातून औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आणून तिची तोडफोड करण्यास सुरूवात केली. यामुळे काही काळ परिसरात तणाव होता.
यावेळी दिलेल्या निवेदनात औरंगजेब अहिल्यानगर येथे मृत झाला. पण त्याची कबर छत्रपती संभाजीनगर येथे बांधण्यात आली. औरंगजेबाने शिख गुरू तेगबहादुर यांची हत्या केली तसेच गोवींदसिंह यांच्या दोन बाल साहेबजाद्यांना भिंतीत जिवंतपणी चिणून मारले. छत्रपती संभाजी महाराजांवर केलेले अत्याचार सर्वांनाच माहीत आहेत. अशा क्रुर व्यक्तीची कबर म्हणजे यातनांचे प्रतिक आहे. ती त्वरीत हटवली नाही तर देशभरातील शिवशंभु प्रेमी कार्यकर्ते कारसेवा करून ते हटवतील असा इशारा देण्यात आला.
यावेळी पराग फडणीस, अक्षय ओतारी, स्वप्नील कोडगे, राजू गडकरी, निखिल उलपे, अनिरुद्ध कोल्हापूरे, किशोर घाटगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.