‘हिंदुस्थान’वाल्यांकडूनच ‘लोकशाही’ला धोका

By Admin | Updated: December 6, 2014 00:31 IST2014-12-05T23:43:39+5:302014-12-06T00:31:55+5:30

यशवंत मनोहर : श्रमिक प्रतिष्ठानच्या कॉमे्रड अवि पानसरे व्याख्यानमालेस उत्स्फू र्त प्रतिसादात प्रारंभ--अवि पानसरेव्याख्यानमाला

'Hindustan' only 'democracy' threat | ‘हिंदुस्थान’वाल्यांकडूनच ‘लोकशाही’ला धोका

‘हिंदुस्थान’वाल्यांकडूनच ‘लोकशाही’ला धोका

कोल्हापूर : प्राचीन भारतातील लोकशाहीचा ज्या धर्मांध वृत्तींनी विध्वंस केला, त्यांच्याच विचारांचे लोक आज देशात सत्तेत आहेत़ त्यांना संविधानाने दिलेली लोकशाही मान्य नाही़ या लोकांना भारत नव्हे, तर ‘हिंदुस्थान’ घडवायचा आहे़ लोकशाहीला त्यांचाच धोका आहे. लोकशाहीने दिलेली समतेची, बंंधुतेची आणि धर्मनिरपक्षतेची मूल्ये जाणीवपूर्वक पायदळी तुडवली जात आहेत. अशावेळी जातिपातीच्या चौकटीतून मुक्त होऊन लोकशाहीच्या रक्षणासाठी समाजाने पुढे येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व कवी डॉ़ यशवंत मनोहर यांनी केले़ येथील शाहू स्मारक भवनमध्ये आज, शुक्रवारपासून श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने अवि पानसरे व्याख्यानमाला सुरु झाली. मनोहर यांनी व्याखानमालेचे पहिले पुष्प गुंफले़ ‘लोकशाही व परिघाबाहेरील समाज’ हा व्याख्यानाचा विषय होता़ ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे अध्यक्षस्थानी होते़
डॉ़ मनोहर म्हणाले, प्राचीन काळातही भारतीय समाजात लोकशाहीचे अस्तित्व होते़; पण आर्य आणि वैदिक वाङ्मयाच्या काळात लोकशाहीचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली़ गौतम बुद्ध यांनी लोकशाहीची मूल्ये टिकविण्याचा प्रयत्न हयातभर केला़; पण त्यांच्या पश्चात भारतातील लोकशाही संपली आणि वर्णावर आधारित समाजाची रचना झाली़ या व्यवस्थेने समाजात विषमतेची बीजे पेरली़ श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्वाच्या भूमिकेमुळे समाजाचे विभाजन झाले़ भारतीय घटनेने संविधानाचा स्वीकार करीपर्यंत ही विषमता अशीच होती़ मनुष्याच्या अस्तित्वाचा आदर होत नव्हता़; पण भारतीय घटनेने समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता ही मूल्ये दिल्यामुळे माणसाला प्रतिष्ठा मिळाली; पण सध्या जे सत्ताधारी आहेत, त्यांच्या वारसा हा प्राचीन लोकशाही नेस्तनाबूत करणाऱ्यांचा आहे़ यांना भारतीय संविधान मान्य नाही. जाती, धर्म, स्त्री-पुरुष भेदभाव ही त्यांची धार्मिक आयुधे आहेत़ या आयुधांचा वापर करून समाजात दुफळी माजविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो़ कामगार विरोधी धोरण, मागासवर्गीय पदोन्नतीचे आरक्षण रद्द करण्याबाबतचे धोरण, विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांची पुनर्रचना ही त्याची झलक आहे.
लोकशाहीच्या मूल्यांचे रक्षण करण्याची आवश्यकता मांडताना,
डॉ़ मनोहर म्हणाले, लोकशाहीची मूल्ये टिकविण्याचे आव्हान बहुजन समाजापुढे आहे़ यासाठी भारतीय लोकशाहीला प्राचीन लोकशाहीचा कसा आधार आहे हे बुद्धिभेद करणाऱ्यांना सांगण्यासाठी आपण पुढे आले पाहिजे. प्रौढ मतदारांवर लोकशाहीचा योग्य तो संस्कार होणे ही काळाची गरज आहे़ जातिपातींच्या आणि सरंजामशाहीच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन लोकशाहीच्या रक्षणासाठी बहुजन समाजाने एकत्र यावे़
गोविंद पानसरे म्हणाले, धर्मांध शक्ती जरी सत्तेत आल्या तरी, या देशातील जनता शहाणी आहे़ जेव्हा-जेव्हा लोकशाहीवर आक्रमण झाले़, तेव्हा-तेव्हा जनतेने सुज्ञपणा दाखविला आहे़ इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यानंतर, त्यानंतर आलेल्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव झाला होता़ त्यामुळे धर्मांध शक्तींनी कितीही प्रयत्न केले तरी भारतीय लोकशाहीला धोका नाही. त्यासाठी स्वत:च्या मताने मतदान करणारी पिढी घडविण्याची जबाबदारी पुरोगामी चळवळींवर आहे़ लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रबोधन करण्यासाठी व्यापक चळवळीची गरज आहे़ही व्याख्यानमाला त्याचाच एक प्रयत्न आहे़
पाहुण्यांचे स्वागत कॉम्रेड चिंतामणी मगदूम यांनी केले. विलास रणसुभे यांनी प्रास्ताविक केले़ रमेश वडणगेकर यांनी व्याख्यानमालेची पार्श्वभूमी सांगितली़ यावेळी श्रमिक प्रतिष्ठानचे विश्वस्त चिंतामणी मगदूम, सुभाष वाणी, आनंदराव परुळेकर, एस़ बी़ पाटील, आदी व्यासपीठावर उपस्थित होते़


व्याख्यानमालेच्या पहिल्याच दिवशी शाहू स्मारकात प्रचंड गर्दी झाली़ अनेक नागरिकांनी उभे राहून शेवटपर्यंत व्याख्यानास उपस्थिती दर्शविली़ दरवर्षी या व्याख्यानमालेला चांगला प्रतिसाद मिळतो़ एकाच विषयाची वेगवेगळ्या अंगाने सखोल मांडणी हे व्याख्यानमालेचे वैशिष्ट्य आहे़

आजचे व्याख्यान
पक्ष पद्धती आणि लोकशाही
वक्ते : डॉ. यशवंत सुमंत
स्थळ : शाहू स्मारक भवन
वेळ : सायंकाळी ६.

Web Title: 'Hindustan' only 'democracy' threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.