Kolhapur: दरेवाडीत गव्यांच्या कळपाचा वावर, तीन एकरातील शेती पिकांचा केला सुपडासाफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 16:34 IST2025-02-18T16:34:28+5:302025-02-18T16:34:52+5:30
शेती पिकवायची की सोडून द्यायची असा सवाल शेतकऱ्यांनी वनविभागाला केला

Kolhapur: दरेवाडीत गव्यांच्या कळपाचा वावर, तीन एकरातील शेती पिकांचा केला सुपडासाफ
पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील दरेवाडी येथील खोरी नावाच्या शिवारातील तीन एकरातील शेती पिकांचा गव्यांच्या कळपाने सोमवारी पहाटे सुपडासाफ केला. आसुर्ले-पोर्ले परिसरातील डोंगराकडच्या शेती पिकांची पंधरा दिवसांपासून गव्यांच्या कळपाकडून नासधूस सुरू आहे. वन्यप्राण्यांचा त्रास आणि नुकसान भरपाईच्या कागदपत्रांसाठी कराव्या लागणाऱ्या त्रासाचा अनुभव पाहता शेतकरी डोंगराकडची शेती पिकवायची की सोडून द्यायची या विचारात आहेत.
पावनगडाच्या जंगलात ३० ते ३५ गव्यांचा कळप तळ ठोकून आहे. दिवसभर जंगलात विसावा घ्यायचा आणि सायंकाळनंतर अन्न पाण्याच्या शोधात लोकवस्तीत उतरण्याचा गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांचा नित्यक्रम आहे. रोज वेगवेगळ्या शिवारातील शेती पिके खाताना गवे शेतीची पुरती वाट लावत आहेत. कष्ट करून आणि पैसा घालून वाढीस लावलेल्या पिकांचा गवे एका रात्रीत फडशा पाडत आहेत.
खोरी नावाच्या शिवारातील सुरेश जाधव, काशिनाथ जाधव, अविनाश जाधव, बाजीराव लव्हटे, महेश जाधव, भगवान जाधव या सहा शेतकऱ्यांच्या तीन एकरातील ऊस, मका आणि शाळू पीक खाऊन शेतात नासधूस केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून गव्यांचा त्रास शेतकरी सोसत असून अजून किती वर्षे त्रास सोसायचा असा सवाल शेतकऱ्यांनी वनविभागाला केला आहे. जीवावर उदार होऊन रात्री-अपरात्री गव्यांपासून पिकांची राखण करणे हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांकडे शिल्लक राहिला आहे. वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त केला नाही तर शेतकऱ्यांना शेती पिकवणे सोडून द्यावी लागेल.