कोल्हापूरला वळवाचा दणका, वाऱ्यामुळे झाडांची पडझड; रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने वाहतुकीची कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 16:26 IST2025-05-13T16:25:19+5:302025-05-13T16:26:18+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात सोमवारी दुपारी काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला तर अनेक ठिकाणी नुसत्या हलक्या सरी कोसळल्या. वाऱ्यामुळे ...

कोल्हापूरला वळवाचा दणका, वाऱ्यामुळे झाडांची पडझड; रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने वाहतुकीची कोंडी
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात सोमवारी दुपारी काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला तर अनेक ठिकाणी नुसत्या हलक्या सरी कोसळल्या. वाऱ्यामुळे शिवाजी विद्यापीठ परिसरात झाडांची पडझड झाली आहे. जिल्ह्यात आगामी चार-पाच दिवस पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेली दोन दिवस जिल्ह्यात वळीव पाऊस पडेल तिथे पडेल, असा होत आहे. रविवारी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने पाणी पाणी झाले. तर काही भागांत तुरळक सरी कोसळल्या. सोमवारी सकाळपासूनच उष्म्यात वाढ झाली होती. दुपारनंतर पाऊस तडाखा देणार असेच वाटत होते. दुपारनंतर कोल्हापूर शहरात मेघगर्जना सुरू झाली आणि सरी कोसळू लागल्या; पण काही ठिकाणी जोरदार तर इतर भागांत हलका पाऊस झाला.
बसस्थानक परिसरात पाऊस..
सोमवारी दुपारी दाभोलकर कॉर्नर, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, ताराराणी पुतळा या भागात जोरदार पाऊस झाला. रस्त्यावर पाणी पाणी झाले होते. मात्र, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, दसरा चौक या परिसरात तुरळक सरी कोसळल्या.
पाऊस उघडला, कोंडी वाढली
अचानक पाऊस तेही जोरदार सुरू झाल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दुचाकी चालक रस्त्याच्या कडेला गाड्या लावून थांबले होते. पाऊस उघडला आणि एकदम सगळे रस्त्यावर उतरल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.