कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेबाबत १५ डिसेंबर २० रोजी पुण्यात उपायुक्त डॉ. पी. बी. पाटील यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. सदस्या वंदना मगदूम यांनी या कामकाजाबाबत तक्रार केली होती.
सर्वसाधारण सभेची नोटीस वेळेत न मिळणे, पंधराव्या वित्त आयोगाच्या ठरावाची संदिग्धता या विषयांवर मगदूम यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानुसार आता ही सुनावणी लावण्यात आली आहे. यासाठी अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांना उपस्थित राहण्याबाबत नोटीस काढण्यात आली आहे. वस्तुस्थितिदर्शक अहवाल सादर करण्याच्याही सूचना मित्तल यांना देण्यात आल्या आहेत.