Kolhapur: देवघेव नोंदवही प्रकरणी आरोग्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश, कक्षसेवक शशिकांत कारंडे याची बदली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 12:42 IST2025-12-10T12:42:20+5:302025-12-10T12:42:43+5:30
तीन सदस्यीय चौकशी समिती

Kolhapur: देवघेव नोंदवही प्रकरणी आरोग्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश, कक्षसेवक शशिकांत कारंडे याची बदली
कोल्हापूर : वैद्यकीय बिलांच्या फाइल्सच्या मंजुरीसाठी कोणाला किती पैसे दिले, याचा हिशोब असलेल्या नोंदवहीप्रकरणी सार्वजनिक आरोग्यमंत्री, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंगळवारी चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार समितीची स्थापना करण्यात आली असून कक्षसेवक शशिकांत कारंडे याची खुपिरे ग्रामीण रुग्णालयाकडे तडकाफडकी बदली करण्यात आली.
उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी कार्यकर्त्यांसह सीपीआरमध्ये सोमवारी स्टिंग ऑपरेशन केले. यावेळी वैद्यकीय बीलांच्या फाइल्स तपासताना त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या पैशाची देवाणघेवाण केल्याची आणि ते पैसे कोणाला दिले याची तारीखवार नोंद असलेली वहीच सापडली. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांना धारेवर धरले होते आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
हा प्रकार समजल्यानंतर सार्वजनिक आरोग्यमंत्री आबिटकर यांनी संबंधितांची चांगलीच कानउघाडणी केली असून चौकशीचे आदेश दिले. याबाबत त्यांनी उपसंचालक माने यांच्या सूचना दिल्यानंतर माने यांच्याच अध्यक्षतेखाली एकूण त्रिसदस्यीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली. हिवताप विभागाचे सहायक संचालक डॉ. संजय रणवीर, सांगलीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक वरक यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला. वृत्रपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे दस्तऐवजासह अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान याप्रकरणी कक्षसेवक कारंडे याची खुपिऱ्याला बदली करण्यात आली आहे. या सर्व नोंदी कारंडे यांनी केल्याचा संशय असून ही नोंदवही सापडल्यानंतर तेथून ते पसार झाले होते. त्यामुळे हा संशय आणखी बळावला. वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक विभागाकडील कामकाजाचा तात्काळ निपटारा करण्याबाबत आणि गोषवारा सादर करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
‘सीएस’ कार्यालयात एकमेव चर्चा
या प्रकरणामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगण्यात आली असून या प्रकरणाचीच चर्चा दिवसभर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात सुरू होती. याआधी या ठिकाणी दिवसभर गोळा केलेले पैसे आतील फ्रीजमध्ये कसे ठेवण्यात येत होते, विविध कार्यक्रमांसाठी वर्गणी मागायला कोण कोण येत होते, याचीही चर्चा सुरू होती.
माने, वाडकर तातडीने नागपूरला रवाना
दरम्यान या प्रकरणानंतर आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर हे तातडीने नागपूरला रवाना झाले. मलकापूर ग्रामीण रुग्णालय आणि सांगली जिल्ह्यातील एका रुग्णालयासंबंधी अधिवेशनात प्रश्न उपस्थित होणार असल्याने या दोघांनाही तिकडे पाचारण करण्यात आले आहे.
अनेक शासकीय कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त
वैद्यकीय बिलांच्या फाइलच्या मंजुरीसाठी वारंवार हेलपाटे मारायला लावणाऱ्या अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनी हा प्रकार उघडकीस आल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.