आठवड्यातून एक दिवस केवळ महिलांची आरोग्य तपासणी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा उपक्रम
By समीर देशपांडे | Updated: January 2, 2025 18:44 IST2025-01-02T18:43:50+5:302025-01-02T18:44:26+5:30
प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘पिंक ओपीडी’

आठवड्यातून एक दिवस केवळ महिलांची आरोग्य तपासणी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा उपक्रम
समीर देशपांडे
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नव्या वर्षात ‘पिंक ओपीडी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या संकल्पनेतून या उपक्रमांतर्गत प्रत्येक आठवड्याला प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात एका दिवशी केवळ बालिका, युवती आणि महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील बाराही तालुक्यांत ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. बहुतांशी ही आरोग्य केंद्रे पंचक्रोशीतील मोठ्या गावांमध्येच कार्यरत असल्याने साहजिकच या ठिकाणी रुग्णांची मोठी गर्दी असते. त्यामुळे अनेक वेळा रुग्णांना तपासणीसाठी विलंब होण्याची शक्यता असते. अशातच महिला, पुरुष्, बालके यांच्या एकत्रित तपासणीतून सर्वच घटकांना सेवा देण्यास विलंब होतो. अनेक ठिकाणी महिला रुग्णांना पुरुष मंडळीच घेऊन तपासणीसाठी येतात. या विलंबामुळे सर्वांचाच या ठिकाणी वेळ जातो.
आपल्याकडे महिला वर्ग हा शेतीकामासाठीही मोठ्या प्रमाणावर जातो. त्यामुळे महिला रुग्णांसोबत महिला आल्यास त्यांच्याही कामाचा खोळंबा होतो. यातून पर्याय म्हणून कार्तिकेयन यांनी ‘पिंक ओपीडी’ ही संकल्पना मांडली आहे. त्यानुसार आठवड्यातील एक दिवस केवळ महिलांचीच आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याचा अर्थ इतर वेळी तपासणी होणार नाही असा नाही. इतर वेळी अत्यावश्यक उपचारासाठी महिला रुग्ण आल्यास उपचार होणारच आहेत; परंतु ठरलेल्या दिवशी प्रामुख्याने महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
या दिवशी प्रामुख्याने महिला डॉक्टरांंची उपस्थिती ठेवण्यासाठीही प्रयत्न केले जातील, तसेच गरज पडल्यास त्या दिवशी मानसोपचारतज्ज्ञ, युवतींसाठी समुपदेशन ठेवण्याचेही नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या त्या तालुक्यातील ‘पिंक ओपीडी’चे दिवस ठरवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी सांगितले.
महिलांच्या आरोग्याला प्राधान्य
आजारपण अंगावर काढण्याची महिलांची मानसिकता असते. त्यातून अनेक आजारांचे उशिरा निदान होते; परंतु ‘पिंक ओपीडी’च्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून महिलांनी आरोग्य केंद्रात येऊन तपासणी करून घ्यावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यांच्या नियमित आरोग्य तपासणीपासून ते कॅन्सरसह अन्य आजारांच्या निदानाबाबत तपासणी करून महिलांचे आरोग्य निकोप राहावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.