Kolhapur ZP Election Results 2026: मुश्रीफ, सतेज यांचे वारे; आबिटकर, कोरे, नरकेंचे बदलले तारे

By विश्वास पाटील | Updated: February 10, 2026 13:03 IST2026-02-10T13:01:35+5:302026-02-10T13:03:34+5:30

दोस्त दोस्त ना रहा.., नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही लोकबळ

Hasan Mushrif emerged as the kingmaker in Kolhapur Zilla Parishad and Panchayat Samiti elections. Satej Patil gave a good fight Prakash Abitkar, Vinay Kore, Chandradeep Narke get a shock | Kolhapur ZP Election Results 2026: मुश्रीफ, सतेज यांचे वारे; आबिटकर, कोरे, नरकेंचे बदलले तारे

Kolhapur ZP Election Results 2026: मुश्रीफ, सतेज यांचे वारे; आबिटकर, कोरे, नरकेंचे बदलले तारे

विश्वास पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार)चे नेते हसन मुश्रीफ हे किंगमेकर ठरले. महापालिकेपाठोपाठ या निवडणुकीतही सतेज पाटील यांनी चांगली लढत देऊन अजूनही या जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसची मुळे असल्याचे दाखवून दिले. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जिल्ह्याच्या राजकारणात दखल घ्यावी लागेल इतके चांगले यश मिळवले आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे, भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांच्यासह माजी खासदार संजय मंडलिक यांना मात्र धक्के बसले. उद्धवसेना व राष्ट्रवादी (शरद पवार) अस्तित्वहीन ठरले.

जे नेते आणि उमेदवारी दिलेले कार्यकर्तेही जिथे राबले त्यांना लोकांनी गुलाल लावल्याचे चित्र दिसत आहे. या निवडणुकीत पैसा, जेवणावळी, विविध आमिषे या पातळीवर कुणीच मागे राहिले नव्हते. त्यामुळे त्याचा वापर झाला म्हणून आमचा पराभव झाला असे म्हणण्याची संधी फारशी कुणाला नाही. 

मंत्री मुश्रीफ यांनी नगरपालिका निवडणुका ताकदीने लढवल्या; परंतु कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिंदेसेनेच्या स्पर्धेत ज्या जागा वाट्याला आल्या त्याच घेऊन ते लढले. त्यामुळे त्यांना मर्यादित यश मिळाले. या निवडणुकीत मात्र त्यांनी स्वत:च्या जोडण्या लावल्या. उमेदवार मर्जीनुसार ठरवले व ते एकटेच सगळीकडे प्रचारासाठी फिरले.

ऐन निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याच्या सहानुभूतीचा मोठा फायदा राष्ट्रवादीला झाला. कोणतीही निवडणूक अंगावर घेऊन लढण्याची त्यांची पद्धत आहे. त्यानुसार ते पायाला भिंगरी बांधून सगळीकडे फिरले. त्या प्रयत्नांचे हे यश आहे. त्यांच्या स्वत:च्या कागल तालुक्यात तिन्ही गट एकत्र आल्याने अपेक्षित यश मिळाले.

आतापर्यंत कागल सोडून अन्य तालुक्यात राष्ट्रवादी मर्यादित होता. यावेळेला गडहिंग्लज-आजरा-चंदगडला राजेश पाटील व नंदाताई बाभूळकर, करवीरमध्ये राहुल पाटील, पन्हाळ्यात बाबासाहेब पाटील, शाहूवाडीत रणवीर गट यांची ताकद त्यांना मिळाल्याने या पक्षाच्या जागा वाढल्या. मूळ राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरचे आतापर्यंतचे हे सर्वाधिक यश म्हटले पाहिजे.

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही मुश्रीफ यांच्याप्रमाणेच काँग्रेस म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाण्यास प्राधान्य दिले. त्यांनी करवीर, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांवर ताकद लावली. त्यानुसार त्यांना या तालुक्यातून यश मिळाले. करवीरमधून राहुल पाटील यांचा गट राष्ट्रवादीत गेल्यावर त्यांनी सर्व १२ मतदारसंघांत उमेदवार देऊन लढत दिली.

शेजारच्या राधानगरी तालुक्यात ए. वाय. पाटील यांना सोबत घेऊन सतेज यांनी चांगली मोट बांधली. हातकणंगलेतील जनसुराज्यच्या दोन हक्काच्या जागा त्यांनी काढून घेतल्या.

गगनबावड्यातील वर्चस्व कायम ठेवले. काँग्रेस एकटी लढत आहे, तुम्ही मला साथ द्या, अशी साद त्यांनी घातली व त्याला जनतेने प्रतिसाद दिला म्हणूनच त्यांना १५ जागा जिंकता आल्या.
राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळमधील भाजप व काँग्रेसच्या आघाडीला थोपवून आपणच त्या तालुक्याच्या राजकारणातील बाजीगर असल्याचे दाखवून दिले.

जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांचा मतदारसंघातील संपर्क तुटल्याचे या निकालाने स्पष्ट केले. त्यांना त्यांच्या होम पिच असलेल्या पन्हाळा तालुक्यात एकही जागा चिन्हावर जिंकता आलेली नाही. या तालुक्यात राष्ट्रवादीने मारलेली मुसंडी त्यांना आव्हान देणारी आहे. या तालुक्यातील यशवंतदादांचा गट पुन्हा पुनरुज्जीवित झाला.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना भुदरगडमध्ये यश मिळाले; परंतु शिंदेसेनेचे प्रमुख नेते म्हणून अन्यत्र प्रभाव पाडता आला नाही. आमदार चंद्रदीप नरके यांचेही तसेच झाले. करवीर विधानसभेतील फक्त वडणगेची एकच जागा त्यांना जिंकता आली. खासदार धैर्यशील माने यांनी मात्र दोन जागांवर बाजी मारली.

चंदगडमध्ये भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांना दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीने चांगलेच रोखले. तिथे आमदार पाटील यांनी निवडणूक हलक्यात घेतल्याचा हा परिणाम आहे.

मंडलिक गटाला हादरा

कागल तालुक्यात माजी खासदार संजय मंडलिक यांचा दारुण पराभव झाला. वारंवार भूमिका बदलल्याचा फटका त्यांना बसला. एकेकाळी हाच तालुक्याच्या राजकारणातील मध्यवर्ती गट होता. भुदरगड तालुक्यात माजी आमदार के.पी. पाटील यांच्याही हाताला काही लागले नाही.

दोस्त दोस्त ना रहा..

आमदार विनय कोरे यांचे मंत्री मुश्रीफ व सतेज पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणातील तसे दोस्तच; परंतु या निवडणुकीत या दोस्तांनीच कोरे यांच्या जनसुराज्यला धोबीपछाड देऊन राजकारणात कोण कुणाचे नसते याचेच प्रत्यंतर दिले.

Web Title : कोल्हापुर ZP चुनाव: मुश्रीफ चमके, कोरे को झटका, राजनीतिक समीकरण बदले।

Web Summary : कोल्हापुर जिला परिषद चुनाव में मुश्रीफ किंगमेकर बने। सतेज पाटिल की कांग्रेस का प्रदर्शन अच्छा रहा। आबिटकर, कोरे और मंडलिक को नुकसान हुआ। राष्‍ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) को बड़ा फायदा, कांग्रेस का प्रदर्शन भी अच्‍छा रहा।

Web Title : Kolhapur ZP Election: Mushrif, Satej shine; Abitkar, Kore face setbacks.

Web Summary : In Kolhapur ZP elections, Mushrif emerged as kingmaker. Satej Patil's Congress showed strength. Setbacks for Abitkar, Kore, Mandlik. NCP gained significantly; Congress also performed well, while Shiv Sena (UBT) struggled.