सोशल मीडियात गाजतेय कोल्हापूरची 'चंद्रा', ठसकेबाज नृत्याचा अभिनेत्री अमृता खानविलकर यांनीही शेअर केला व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 11:50 IST2023-03-22T11:49:03+5:302023-03-22T11:50:30+5:30

यूट्यूबवर नृत्याचे व्हिडीओ पाहून स्वत: चंद्रा गाण्यावर नृत्य बसवले

Harshada Kamble dance on Chandra song from Anuskura in Kolhapur district went viral on social media, Actress Amrita Khanwilkar also shared the video | सोशल मीडियात गाजतेय कोल्हापूरची 'चंद्रा', ठसकेबाज नृत्याचा अभिनेत्री अमृता खानविलकर यांनीही शेअर केला व्हिडीओ 

सोशल मीडियात गाजतेय कोल्हापूरची 'चंद्रा', ठसकेबाज नृत्याचा अभिनेत्री अमृता खानविलकर यांनीही शेअर केला व्हिडीओ 

कोल्हापूर : चंद्रमुखी चित्रपटातील प्रसिद्ध चंद्रा या गीताने अनेकांना वेड लावले. कोल्हापूर जिल्ह्यातील अणुस्कुरा (ता. शाहूवाडी) येथील सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या हर्षदा कांबळे या मुलीने यूट्यूबवर पाहून या गाण्यावर नृत्य केले आहे. हर्षदाच्या ठसकेबाज नृत्याचा व्हिडीओ खुद्द अभिनेत्री अमृता खानविलकर यांनीही सोशल मीडियात शेअर केला आहे.

निसर्गसंपन्न अणुस्कुरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहावीच्या वर्गातील हर्षदा कांबळे हिला नृत्याची आवड आहे. तिचे वडील शेती करतात, तर आई आशासेविका आहे. रिकाम्या वेळेत ती मोबाइलमध्ये यूट्यूबवर नृत्याचे व्हिडीओ पाहते. याच आवडीतून तिने स्वत: चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा गाण्यावर नृत्य बसवले. आठ मार्चला महिलादिनी शाळेत शिक्षक अनिल कांबळे यांनी हर्षदाच्या नृत्याचा व्हिडीओ चित्रित केला. गेल्या दोन दिवसांपासून हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून, तो सर्वांच्या पसंतीस उतरत आहे.

‘दिसला कशानं सख्या सजना, सांग लुकलुकणारा दिवा...’ या गाण्यावरील हर्षदाचे नृत्य पाहणाऱ्यांना सुरुवातीपासून खिळवून ठेवते. शाळेच्या गणवेशात केलेले ठसकेबाज नृत्य, चेहऱ्यावरील समर्पक हावभाव आणि देहबोली यांमुळे अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या नृत्याची आठवण होते. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केला असून, त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्ता, खेड्यातील खरे टॅलेंट, हर्षदाचे अमृताला आव्हान अशा कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. विशेष म्हणजे खुद्द अभिनेत्री अमृता खानविलकर यांनीही हर्षदाच्या नृत्याचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला असून, तिचे कौतुक केले आहे.

Web Title: Harshada Kamble dance on Chandra song from Anuskura in Kolhapur district went viral on social media, Actress Amrita Khanwilkar also shared the video