जिल्हा परिषदेचे निम्मे कर्मचारी निवडणुकीच्या कामात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 15:42 IST2019-10-10T15:41:49+5:302019-10-10T15:42:48+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या ४०६ ‘क’,‘ड’ वर्गांतील कर्मचाऱ्यांपैकी २२५ कर्मचाऱ्यांना नेमण्यात आले आहे. जवळपास निम्मे कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी व्यस्त असल्याने साहजिकच जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.

जिल्हा परिषदेचे निम्मे कर्मचारी निवडणुकीच्या कामात
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या ४०६ ‘क’,‘ड’ वर्गांतील कर्मचाऱ्यांपैकी २२५ कर्मचाऱ्यांना नेमण्यात आले आहे. जवळपास निम्मे कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी व्यस्त असल्याने साहजिकच जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.
सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, अर्थ विभाग, आरोग्य, पशुसंवर्धन, माध्यमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण, ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी, समाजकल्याण, महिला आणि बालकल्याण, स्वच्छता व पाणीपुरवठा, यांत्रिकी, इमारत विभागाचे एकूण ४०६ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी १५ जणांची ‘बीएलओ’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
तसेच ७५ कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नियुक्ती करण्यात आली आहे; तर १३५ कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रांवर नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांचे आदेश निघाले असून, त्यांची प्रशिक्षणेही सुरू झाली आहेत.