चंदगड तिलारीनगरमध्ये साडेदहा लाखांचा मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 10:26 IST2019-12-11T10:22:23+5:302019-12-11T10:26:18+5:30
चंदगड तालुक्यातील तिलारीनगर शेतवडी येथे मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकला. यावेळी भरधाव वेगाने मुख्य रस्त्याकडे येणाऱ्या बोलेरो जीपला थांबवून तिची तपासणी केली असता सहा लाख सात हजार रुपये किमतीचे गोवा बनावट मद्याचे ११० बॉक्स तसेच चार लाख ५७ हजार किमतीचे वाहन व मोबाईल असा एकूण १० लाख ६४ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चंदगड तालुक्यातील तिलारीनगर शेतवडी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडलेला विदेशी मद्याचा साठा व संशयित.
कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील तिलारीनगर शेतवडी येथे मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकला. यावेळी भरधाव वेगाने मुख्य रस्त्याकडे येणाऱ्या बोलेरो जीपला थांबवून तिची तपासणी केली असता सहा लाख सात हजार रुपये किमतीचे गोवा बनावट मद्याचे ११० बॉक्स तसेच चार लाख ५७ हजार किमतीचे वाहन व मोबाईल असा एकूण १० लाख ६४ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चालक प्रीतेश उल्हास पांगम (वय २९, रा. कोनाळकट्टा, कट्टावाडी, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) याला ताब्यात घेतले.
तिलारी घाटमार्गावरून काही व्यक्ती बेकायदा गोवा बनावट मद्याची अवैधरीत्या चोरटी वाहतूक करून मद्याची देवाणघेवाण करणार आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. या मार्गावर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचला.
मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास तिलारीनगर येथील वीजनिर्मिती कार्यालयासमोरील शेतवडीत काहीजणांची संशयास्पद हालचाल दिसून आली. पथकातील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी छापा घातला असता तेथे महिंद्रा कंपनीची बोलेरो जीप थांबलेली दिसून आली. या वाहनाची तपासणी करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी गेले असता संशयितांना छाप्याची चाहुल लागली. संशयितांनी वाहन चालू करून भरधाव वेगाने मुख्य रस्त्याकडे येण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांच्याजवळील वाहन बोलेरोसमोर उभे करून तपासणी केली असता त्यामध्ये प्रवासी बसण्याच्या रचनेत बदल करून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा बॉक्स मिळून आला. अंधाराचा फायदा घेऊन सुनील राजाराम घोरपडे याच्यासह अन्य पसार झाले.
घोरपडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याला फरार घोषित करण्यात आले आहे. विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार यांच्या आदेशाने जिल्हा अधीक्षक गणेश पाटील व उपअधीक्षक बापूसो चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे, चंदगड पोलीस निरीक्षक सातपुते, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे, जवान संदीप जानकर, सागर शिंदे, सचिन काळे, जय शिनगारे, रंजना पिसे व चंदगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी ही कारवाई केली.