Kolhapur: मित्रांसोबत फिरायला आले, बोटिंग करणे जिवावर बेतले; बोट उलटल्याने जिम प्रशिक्षकाचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 18:28 IST2025-05-03T18:27:41+5:302025-05-03T18:28:03+5:30
गगनबावडा : तालुक्यातील अणदूर येथील तलावात जिम प्रशिक्षकाचा बुडून मृत्यू झाला. सचिन संभाजी जगदाळे (वय ३१, रा. आंबवडे, ता. ...

Kolhapur: मित्रांसोबत फिरायला आले, बोटिंग करणे जिवावर बेतले; बोट उलटल्याने जिम प्रशिक्षकाचा बुडून मृत्यू
गगनबावडा : तालुक्यातील अणदूर येथील तलावात जिम प्रशिक्षकाचा बुडून मृत्यू झाला. सचिन संभाजी जगदाळे (वय ३१, रा. आंबवडे, ता. पन्हाळा) असे मृताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी घडली.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सचिन हे शिरोली येथील जिममध्ये प्रशिक्षक होते. गुरुवारी तीन मित्रांसमवेत ते अणदूर तलाव येथे फिरायला आले होते. तलावाजवळ फार्म हाऊसशेजारी रिकाम्या असलेल्या बोटीने चौघे बोटिंगसाठी तलावात उतरले असता खोल पाण्यात गेल्यानंतर बोट उलटल्याने चौघे जण बुडू लागले. यातील तिघांना पोहता येत असल्याने ते बचावले; परंतु यामध्ये सचिनचा बुडून मृत्यू झाल्याने बोटिंग करणे त्याच्या जिवावर बेतले.
घटना समजताच गगनबावडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली; परंतु रात्री अंधार पडल्याने शोधकार्य राबविता आले नाही. शुक्रवारी सकाळी आपत्ती निवारणची टीम बोलवून तब्बल आठ तास शोध घेतला असता दुपारी सव्वातीन वाजता सचिन यांता मृतदेह खोल पाण्यात मिळून आला. गगनबाबडा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, असा परिवार आहे. याबाबतची वर्दी सचिन यांचा भाऊ स्वप्निल संभाजी जगदाळे यांनी गगनबावडा पोलिसांत दिली.