Datta Jayanti 2025: दत्त नामाचा गजर, भाविकांच्या गर्दीत नृसिंहवाडीमध्ये भक्तीमय वातावरणात दत्तजन्मकाळ सोहळा संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 17:50 IST2025-12-04T17:50:27+5:302025-12-04T17:50:46+5:30
Nrusinhawadi Datta Jayanti 2025 Celebration: मार्गशीष गुरुवार आणि दत्त जयंतीचा दुग्धशर्करा योग एकाच दिवशी आल्याने दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Datta Jayanti 2025: दत्त नामाचा गजर, भाविकांच्या गर्दीत नृसिंहवाडीमध्ये भक्तीमय वातावरणात दत्तजन्मकाळ सोहळा संपन्न
प्रशांत कोडणीकर
नृसिंहवाडी: श्री दत्त जयंती निमित्त अखंड दत्त नावाने श्री क्षेत्र नृसिंहवाडी दुमदुमली व दिगंबराच्या अखंड भजनात व श्री गुरुदेव दत्तच्या गजरात श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा व पंचगंगा संगमतीर्थावर भक्तीमय वातावरणात श्रीदत्त महाराजांच्या राजधानीत आज सायंकाळी पाच वाजता दत्तजन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मार्गशीष गुरुवार आणि दत्त जयंतीचा दुग्धशर्करा योग एकाच दिवशी आल्याने दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
दत्त जयंती निमित्त श्री दत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे तीन वाजता काकड आरती, षोडशोपचार पूजा, सकाळी सात ते बारा या वेळेत अनेक भक्तांनी श्रींना पंचामृत अभिषेक पूजा केली. दुपारी साडेबारा वाजता श्रींचे चरण कमलावर महापूजा संपन्न झाली.महापूजा नंतर भाविकांना महाप्रसाद वाटण्यात आला.
दुपारी तीन वाजता येतील ब्रह्मवृंदामार्फत पवमान पंचसुतांचे पठण करण्यात आले साडेचार वाजता श्रींची उत्सव मूर्ती श्री नारायण स्वामी मंदिरातून वाजत गाजत मुख्य मंदिरात आणण्यात आली. ह भ प काने बुवा कवठेगुलंद यांच्या कीर्तनानंतर ठीक पाच वाजता धार्मिक वातावरणात असंख भाविक व ब्रह्मबंध यांच्या उपस्थितीत विधी व श्री दत्तजन्मकाळसोहळा संपन्न झाला.
फुलांनी सजवला होता पाळवा
जन्म काळासाठी चांदीचा पाळणा विविध फुलांनी आकर्षक सजवण्यात आला होता. उपस्थित भाविकांनी सजवलेल्या पाळण्यावर अबीर गुलाल व फुलांचे मुक्तहस्ताने उधळण केली. जन्मकाळानंतर येथील दत्त मंदिरात पारंपारिक पाळणा गीते व आरत्या म्हणण्यात आल्या व प्रार्थना करण्यात आली. रात्री १० नंतर धूपदीप आरती व पालखी सोहळा संपन्न होणार आहे.
दत्त जयंती निमित्त पालखी व दत्त मंदिर परिसर पुणे येथील कुलकर्णी परिवार यांनी आकर्षक फुलांनी सजविला होता. उत्सवाचे मानकरी विनोद भानुदास पुजारी यांच्या गणेश दत्त कुंज येथे भाविकांना दर्शनासाठी जन्म काळाचा पाण्यात ठेवण्यात आला. जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा राज्यातून भक्तगण आले होते. अनेकजण पहाटेच्या थंडीत ही चालत आले होते. सायकलवरून देखील येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती.
भाविकांसाठी देवस्थानमार्फत सोयी, सुविधा
भाविकांच्या सोयीसाठी येथील दत्त देवस्थान मार्फत अनेक सोयी व सुविधा उपलब्ध केल्या होत्या मंदिर परिसरात ठीक ठिकाणी क्लोज सर्किट टीव्ही, दर्शन रंगाची उत्तम व्यवस्था तसेच मुखदर्शन व्यवस्था दुपारच्या वेळेस भाविकांसाठी महाप्रसाद वाटप, जन्म काळानंतर सुंठवडा प्रसाद वाटप, सूचनाफलक, ध्वनिक्षेपक यंत्रणा तसेच नदीचा काठ असल्याने तीरावर पट्टीचे पोहणारी युवक तसेच सुरक्षिततेसाठी इनर ट्यूबची व्यवस्था करण्यात आली होती.
जादा बसेसची सोय
एसटी खात्यामार्फत गर्दीचे नियोजन करण्यासाठी कुरुंदवाड सांगली आजरा कोल्हापूर संभाजीनगर कागल चिकोडी इचलकरंजी आधी ठिकाणाहून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. पोलीस तसेच गृहरक्षक दलाच्या सहकार्याने पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. देवस्थान व ग्रामपंचायत कर्मचारी व स्वयंसेवक यांनी यात्रेचे नेटके नियोजन केले.