Kolhapur: फायर स्टेशन इमारत दुर्घटनेप्रकरणी दोन्ही अभियंत्यांना निलंबित करा, पालकमंत्र्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 11:48 IST2025-10-04T11:48:12+5:302025-10-04T11:48:37+5:30
शहरातील रस्त्यांसह सर्वच विकासकामांची बांधकाम विभागाच्या क्वालिटी कंट्रोलकडून चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेशही मंत्री आबिटकर यांनी दिले.

Kolhapur: फायर स्टेशन इमारत दुर्घटनेप्रकरणी दोन्ही अभियंत्यांना निलंबित करा, पालकमंत्र्यांचे आदेश
कोल्हापूर : फुलेवाडीतील अग्निशमन विभागाच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याप्रकरणी केवळ ठेकेदारावरच कारवाई नको तर त्याच्या दर्जाची तपासणी करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या कनिष्ठ व उपशहर अभियंत्यांनाही निलंबित करा, असे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना दिले. शहरातील रस्त्यांसह सर्वच विकासकामांची बांधकाम विभागाच्या क्वालिटी कंट्रोलकडून चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेशही मंत्री आबिटकर यांनी दिले.
कोल्हापूर महानगरपालिकेत मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांच्यासह सर्वच विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री आबिटकर म्हणाले, फुलेवाडीतील अग्निशमन विभागाच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना दुर्दैवी आहे. त्याचे कॉलम खाली कोसळतात यावरुच या कामाचा दर्जा लक्षात येतो. यात ठेकेदारावर कारवाई केली असली तरी कनिष्ठ व उपशहर अभियंता हेही तितकेच दोषी आहेत. त्यांनी कामाची गांभीर्यपूर्वक पाहणीच केली नाही. त्यामुळे त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करा.
शहरातील शंभर कोटींच्या रस्त्यांसह पूर्वीचे ९० कोटी रुपयांचे रस्ते, जिल्हा नियोजनमधील रस्त्यांची क्वालिटी कंट्रोलकडून तपासणी करुन चौकशी करा. यात जे दोषी आढळतील त्या सर्वांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही आबिटकर यांनी दिले. यावेळी सत्यजित कदम, शारंगधर देशमुख, आदिल फरास उपस्थित होते.
पाणीपुरवठ्याच्या चौकशीसाठी समिती नेमून कारवाई
शहरवासीयांना थेट पाईपलाईन योजनेचे पाणी ऐन सणात आठ दिवस मिळाले नाही. पाणीपुरवठा विभागाचे अनेक कर्मचारी-अधिकारी स्पॉटवर जातच नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पाणी का आले नाही याचा शोध घ्या, यासाठी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश मंत्री आबिटकर यांनी दिले. पंप दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारावर असताना त्यावर काय कारवाई केली असा सवालही आबिटकर यांनी विचारला.
खुल्या जागांची विक्री, महापालिका झोपली आहे का ?
शहरातील महापालिकेच्या खुल्या जागांवर अतिक्रमण करुन बांधकामे होत आहेत. काही गुंडांकडून त्या जागांची विक्री होत असतानाही महापालिका त्यावर काहीच कारवाई करत नसल्याचा मुद्दा राजेश क्षीरसागर यांनी निदर्शनास आणून दिला. महापालिकेचे अधिकारीच यात सामील आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन चालवते की गुंड असा सवालही त्यांनी केला.
केशवरावचे काम १ एप्रिलपर्यंत पूर्ण करा
केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामासाठी २५ कोटी रुपयांचा निधी महापालिकेकडे आला आहे. सध्या हे काम प्रगतिपथावर असल्याचे शहर अभियंता रमेश मस्कर यांनी सांगितले. यावर १ एप्रिल २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करण्याची डेडलाईनच पालकमंत्र्यांनी घालून दिली.
आता १३ ऑक्टोबरला बैठक
शुक्रवारच्या बैठकीत जे जे विषय झाले त्या विषयांवर महापालिकेने मिशन मोडवर येऊन कार्यवाही करण्याचे आदेश देत पालकमंत्र्यांनी यासंदर्भातील पुढील आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात १३ ऑक्टोबरला बैठक घेऊन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.