मंजूर १५ कोटींतून रस्ता दर्जेदार होण्याची गरज
By Admin | Updated: December 5, 2014 23:30 IST2014-12-05T23:07:26+5:302014-12-05T23:30:55+5:30
कोल्हापूर-गगनबावडा रस्ता : जानेवारी महिन्यापासून कामाला येणार वेग

मंजूर १५ कोटींतून रस्ता दर्जेदार होण्याची गरज
प्रकाश पाटील - कोपार्डे कोल्हापूर-गगनबावडा रस्ता हा कोकणाला जोडणारा सर्वांत सुरक्षित मार्ग आहे. येथूनच तळकोकणातील अनेक तीर्थस्थळे व गोवा, सिंधुदुर्ग, विजयदुर्गला जाता येत असल्याने या मार्गाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर या रस्त्याचा विकास झाला, तर या मार्गावरील सर्वच गावांचा निश्चितच विकास होऊ शकतो. त्यामुळे या रस्त्यासाठी मंजूर १५ कोटींचा निधी योग्यप्रकारे मार्गी लागण्याची आवश्यकता आहे.
शासनाचे दुर्लक्ष व योग्यवेळी
व मुबलक निधी उपलब्ध होत नसल्याने या रस्त्याची निगा व डागडुजी राखता येत नाही. पावसाळ्यात या मार्गावर प्रचंड पाऊस असतो. परिणामी रस्ता लवकर खराब होतो, असे सांगण्यात आले. या रस्त्यावर बहुतांश ठिकाणी जमिनीचा भाग हा काळवट मातीचा असल्याने रस्ता खचण्याचे व त्याची पातळी बिघडण्याचे प्रकार घडतात.
सध्या या रस्त्यावर ८० टक्के खड्डे पडल्याने लेव्हलिंग कोर्सचे काम चालू आहे. पॅचवर्कचे काम त्यानंतर व नंतर रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरणाला सुरुवात होणार आहे. वर्ष २०१३-१४ मध्ये या रस्त्यावर ७५ लाख रुपये खर्च झाले आहेत. वर्ष २०१४-१५ साठी १५ कोटी मंजूर असून, शिंगणापूर फाटा ते भामटे (ता. करवीर) येथेपर्यंत रस्त्यासाठी दहा कोटी, तर साळवण ते गगनबावडा या रस्त्यासाठी पाच कोटी मिळणार आहेत.
लोकसभेपूर्वीच या मार्गावरील शिंगणापूर फाटा ते भामटे अशा १२ कि.मी.च्या रस्त्यासाठी ‘सीआरएफ’मधून दहा कोटी मंजूर झाले आहेत. विशेष दुरुस्तीमध्ये ६६ लाख आणि ३० लाख असे दोन निधी मंजूर आहेत. १३व्या वित्त आयोगामधून सांगशी ते सैतवडे फाट्यासाठी दोन कोटी २४ लाख निधी मंजूर झाला. पूरहमीतून आणखी सात कोटी मिळणार आहेत. स्टेट बजेटमधूनही आपण या मार्गासाठी स्वतंत्र निधी द्यावा म्हणून मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
- चंद्रदीप नरके, आमदार
सध्या २०१४-१५ मध्ये कोल्हापूर-गगनबावडा मार्गासाठी १५ कोटींचा निधी मंजूर झाला. लवकरच ही कामे सुरू होतील. सध्या या मार्गावर लेव्हिंग कोर्स सुरू असून, शिंगणापूर ते भामटेसाठी रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम चालू करणार आहे. योग्य प्रमाणात निधी मिळाल्यास रस्त्याचे काम चांगले करता येईल.
- एस. व्ही. सांगावकर, उपअभियंता, विशेष प्रकल्प