शशिकांत भोसलेसेनापती कापशी : कर्ज फेडण्यासाठी उसने पैसे देत नसल्याच्या कारणातून नातवानेच आजी सगुना तुकाराम माधव (वय ८३) हिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. सेनापती कापशी (ता. कागल) येथे काल, मंगळवारी रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. आरोपी नातू गणेश राजाराम चौगले (रा. विक्रमनगर, इचलकरंजी) याला दोन अल्पवयीन मित्रांसह बुधवारी पहाटे मुरगूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खुन करून नातू गणेशने आजीच्या अंगावरील दागिने घेऊन पलायन केले होते.येथील माधव गल्लीमध्ये सगुना माधव या एकट्याच राहत होत्या. त्यांना तीन मुले आहेत. पुंडलिक माधव हा सोसायटी जवळील घरामध्ये तर निवृत्ती माधव हा शेतातील घरामध्ये राहतो. तर एक मुलगा नोकरी निमित्त पुण्यात आहे. आजीच्या खात्यावर रोख असल्याचे गणेशला माहित होते. त्यामुळे तो वारंवार येऊन आजीकडे पैशाची मागणी करत होता. गणेशने इचलकरंजी येथील काही लोकांच्याकडून कर्जाने पैसे घेतले होते. त्या पैशाची परतफेड करण्याकरता तो आजीकडे पैशाची मागणी करण्याकरता मंगळवारी दुपारी आपल्या दोन अल्पवयीन मित्रांसह कापशी येथील घरात आला असल्याचे लोकांनी पाहिले होते.दरम्यान, रात्री पुंडलिक यांचा मुलगा सुशांत हा आजीला जेवणाचा डबा देण्यासाठी घरी आला असता त्याला घराला कुलूप दिसले. शेजारी चौकशी केली असता काही माहिती मिळाली नाही. गल्लीत, शेताकडे, गावात शोधाशोध केली तरीही आजी सापडली नाही. रात्री उशिरा घराचे कुलूप तोडले असता खुनाचा प्रकार उघडकीस आला.रात्री उशिरा मुरगुड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुरवातीला हा चोरीचा प्रकार वाटला. पण गल्लीतील लोकांनी दुपारच्या सुमारास दोन अनोळखी तरुण मुले मोटारसायकलवरून फेऱ्या मारत होती अशी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून नातू गणेश याला पहाटे चार वाजता इचलकरंजी येथील घरातून ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास मुरगुड पोलीस करत आहेत.
Kolhapur: कर्ज फेडण्यासाठी उसने पैसे देत नसल्याने नातवानेच केला आजीचा खून, अंगावरील दागिने घेऊन पलायन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 11:58 IST