Kolhapur: शाळांची वीज बिले ग्रामपंचायत भरणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:32 IST2025-01-23T18:31:27+5:302025-01-23T18:32:04+5:30
ग्रामपंचायतीची आर्थिक घडी पुन्हा विस्कटणार

Kolhapur: शाळांची वीज बिले ग्रामपंचायत भरणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
गणपती कोळी
कुरुंदवाड : जिल्हा परिषद शाळांचेवीजदेयके ग्रामपंचायतीने २६ जानेवारीपूर्वी भरावी व २७ तारखेपर्यंत त्याचा अहवाल देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ग्रामपंचायतींना दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्युत दिव्यांनी झळकणार असल्याने शिक्षकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या ग्रामपंचायतींवर शाळांच्या वीजबिलांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याने ग्रामपंचायतींची आर्थिक घडी पुन्हा विस्कटणार आहे.
जिल्हा परिषद शाळेचे वीजबिल शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक लोकवर्गणीतून भरत असे. विजेचा फारसा वापरच नसल्याने नाममात्र वीजबिल भरण्यासाठी वेगळ्या निधीची गरज भासत नव्हती. मात्र, बदलत्या शिक्षण पद्धतीत डिजिटल शाळा, मोबाइल, टॅब, संगणक त्यासाठी इन्व्हर्टर आदींमुळे शाळेमध्ये वीजवापर वाढला आहे. त्यामुळे वीजबिलही जास्त येत असल्याने शिक्षकांची आर्थिक अडचण झाली होती. बिले भरली नसल्याने महावितरण कंपनीने अनेक शाळांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. परिणामी डिजिटल शाळा विजेअभावी अडचणीत आली होती.
याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी येडगे यांनी शैक्षणिक प्रगतीला गती देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांचे वीजदेयके ज्या-त्या ग्रामपंचायतीने भरण्याचे आदेश काढले आहेत. त्यासाठी १५ वा वित्त आयोग, स्वनिधी अथवा ग्रामपंचायतीकडील इतर निधीचा वित्तीय नियमांचे पालन करून वीजबिले भरण्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे वीजबिलाच्या संकटातून शाळांची सुटका झाली असली तरी ग्रामपंचायतीवर बिलाचा अतिरिक्त ताण पडणार आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा - १०७९
शाळांचे वीजबिले थकीत रूपये - ४९ लाख ८ हजार रुपये
ग्रामपंचायतींवर भार
बहुतांश ग्रामपंचायतींची कर थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाची वीजबिले भरली नसल्याने अनेक ग्रामपंचायतींना वीज कनेक्शन तोडण्याची नामुष्की पत्करावी लागते. अशातच शाळांच्याही वीजबिलांचा भार पडल्याने ग्रामपंचायतींची आर्थिक घडी विस्कटणार आहे.