Kolhapur: ‘गोकुळ’ने जाजम, घड्याळ खरेदीबाबत दुग्ध विभागाकडे सादर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 18:56 IST2025-08-27T18:55:39+5:302025-08-27T18:56:15+5:30

उद्धवसेनेने केलेली चौकशीची मागणी

Gokul Milk Association submits clarification to the Milk Department regarding purchase of Jajam, watch | Kolhapur: ‘गोकुळ’ने जाजम, घड्याळ खरेदीबाबत दुग्ध विभागाकडे सादर केला खुलासा

संग्रहित छाया

कोल्हापूर : प्राथमिक दूध संस्थांना देण्यासाठी ‘गोकुळ’ने खरेदी केलेले जाजम व घड्याळ संघाच्या पोटनियमानुसारच असल्याचा खुलासा संघाच्या वतीने सोमवारी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) राजकुमार पाटील यांच्याकडे सादर केला.

गोकुळ’ दूध संघाच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त संलग्न दूध संस्थांना जाजम व घड्याळ भेट वस्तू म्हणून वाटप केले. साधारणत: चार कोटींची सहा हजार जाजम व तेवढेच घड्याळ खरेदी केली. वास्तविक चार कोटींची खरेदी करताना रितसर जाहीर निविदा काढून स्पर्धेतून कमीत कमी दराने खरेदी करणे अपेक्षित आहे, पण संचालकांनी केवळ कोटेशन मागवून खरेदी केल्याचे उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी दुग्ध विभागाच्या निदर्शनास आणून देत चौकशीची मागणी केली होती.

याबाबत, विभागीय उपनिबंधक (दुग्ध) राजकुमार पाटील यांनी ‘गोकुळ’चा खुलासा मागवून आठ दिवसात देण्याचे आदेश दिले होते. संघाने सोमवारी हा खुलासा दुग्ध विभागाकडे सादर केला. संघाच्या १९ मार्च २०२५ च्या संचालक मंडळाच्या सभेत जाजम व घड्याळ खरेदीचा ठराव करण्यात आला.

अशा प्रकारच्या खरेदीस जाहीर निविदा देण्याबाबत संघाच्या पोटनियमात कोणत्याही प्रकारची तरतूद नाही. त्यामुळे ही खरेदीची जाहीर निविदा न देता स्थानिक बाजारात चौकशी करून निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यातील कमीत कमी दर देणाऱ्या निविदाधारकाकडून जाजम व घड्याळ खरेदी केली, असा खुलासा संघाने दुग्ध विभागाला दिल्याचे समजते.

दुग्ध विभागाची लागणार कसोटी

संघाने पोटनियमानुसार जाजम व घड्याळ खरेदीचा खुलासा दुग्ध विभागाकडे केला आहे. मात्र, सादर केलेला खुलासा योग्य की अयोग्य हे ठरवण्याची कसोटी दुग्ध विभागाची लागणार आहे.

‘गोकुळ’कडून जाजम व घड्याळ खरेदीबाबत खुलासा मागितला होता. त्यांनी दिला की नाही, हे अद्याप मी पाहिलेले नाही. - राजकुमार पाटील (विभागीय उपनिबंधक (दुग्ध) पुणे)

Web Title: Gokul Milk Association submits clarification to the Milk Department regarding purchase of Jajam, watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.