Kolhapur: ‘गोकुळ’ची उत्पादकांसाठी खूशखबर; परराज्यांतून म्हैस खरेदीसाठी अनुदानात दहा हजारांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 17:24 IST2025-07-24T17:24:12+5:302025-07-24T17:24:23+5:30

संचालक मंडळाच्या सभेत निर्णय, सचिवांचे पशुखाद्य खरेदीवरील अनुदानही वाढवले

Gokul increases subsidy by Rs 10000 for purchasing buffaloes from other states | Kolhapur: ‘गोकुळ’ची उत्पादकांसाठी खूशखबर; परराज्यांतून म्हैस खरेदीसाठी अनुदानात दहा हजारांची वाढ

Kolhapur: ‘गोकुळ’ची उत्पादकांसाठी खूशखबर; परराज्यांतून म्हैस खरेदीसाठी अनुदानात दहा हजारांची वाढ

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाशी संलग्न दूध उत्पादकांसाठी परराज्यातील म्हैस खरेदी अनुदानात दहा हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या मुंबईतील बैठकीत घेण्यात आला. आता ५० हजार रुपये अनुदान मिळणार असून, फर्टिमिन्स’ पशुखाद्याचे अनुदान ५० टक्के केले आहे.

संघाच्या संचालक मंडळाची सभा बुधवारी संघाच्या वाशी येथील प्रकल्पावर झाली. यामध्ये मुंबईतील वितरकांचा आढावा घेण्यात आला. म्हैस दूध उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी परराज्यातील म्हैस खरेदी अनुदानात वाढ करण्याचा निर्णय संचालकांनी घेतला. यामध्ये म्हैस खरेदी केल्यानंतर वाहतुकीसाठी पूर्वीप्रमाणेच दहा हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यानंतर पहिल्या वेतात पंधरा हजार आणि उर्वरित २५ हजार म्हशीच्या तिसऱ्या वेताला देण्यात येणार आहे. फर्टिमिन्स पशुखाद्याची दीडशे रुपये किंमत आहे, ते दूध उत्पादकांना ७५ रुपयांत मिळणार आहे.

प्राथमिक दूध संस्थांनी खरेदी केलेल्या पशुखाद्यावर सचिवांना कमिशन दिले जाते. त्यामध्येही वाढ करण्यात आली आहे. सध्या महालक्ष्मी गोल्ड प्रतिपोते ६ ते १० रुपये व ‘कोहिनूर डायमंड’ ७ ते १५ रुपयांपर्यंत आहे. यामध्ये ८ ते १६ रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

तर वितरकांवर कारवाई..

मुंबई शहरासह उपनगरात वेळेत दुधाचा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी गेली महिनाभर येत आहेत. त्याचे पडसादही या बैठकीत उमटले. ग्राहकांपर्यंत वेळेत दुधाचा पुरवठा केला नाहीतर कारवाई करण्याचा इशाराही बैठकीत देण्यात आला.

केर्लीतील गोठ्यातून म्हैस खरेदी करणाऱ्यांना ४० हजार

‘एनडीडीबी’चा केर्ली येथे जातिवंत मुऱ्हा म्हशींचा गोठा विक्रीसाठी आहे. तेथून म्हैस खरेदी केल्यास ४० हजार रुपये अनुदान मिळणार आहे. वाहतूक खर्च म्हणून पाच हजार रुपये दिले जाणार आहे.

Web Title: Gokul increases subsidy by Rs 10000 for purchasing buffaloes from other states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.