Gokul Election Result: Gokul dominance to increase in Mumbai Says Satej Patil. Target Mahadik | Gokul Election Result: “आमचं ठरलंय! मुंबईत ‘गोकुळ’चा दबदबा वाढवणार; थोडा वेळ द्या, शब्द पडणार नाही”

Gokul Election Result: “आमचं ठरलंय! मुंबईत ‘गोकुळ’चा दबदबा वाढवणार; थोडा वेळ द्या, शब्द पडणार नाही”

ठळक मुद्देसर्व दूध उत्पादकांचे मनापासून डोकं टेकवून आभार मानतो. आता आमचा नवा अजेंडा आहे. मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणारशेतकऱ्यांना २ रुपये दर वाढवून देणार आहोत.

कोल्हापूर – बहुचर्चित कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत गेल्या ३ दशकापासून सत्तेत असणाऱ्या महाडिक गटाला सुरूंग लावण्यात सतेज पाटील गटाला यश आलं आहे. संघाच्या २१ जागांपैकी १७ जागा मिळवत सतेज पाटील गटाने ‘गोकुळ’मध्ये सत्तांतर घडवून आणलं आहे. सत्ताधारी महाडिक गटाला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

या निकालावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले की, दूध उत्पादकांनी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीला १७ जागा देत चांगलं यश दिलं आहे. सर्व दूध उत्पादकांचे मनापासून डोकं टेकवून आभार मानतो. निवडणुका संपल्यात, कोणी काय केलं याऐवजी  आम्ही काय करणार याकडे लक्ष देणार आहे. आता आमचा नवा अजेंडा आहे. मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार असून शेतकऱ्यांना २ रुपये दर वाढवून देणार आहोत. निवडणुकीत दिलेलं आश्वासन मागे पडणार नाही. काही उणिवा दूर करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या असं सतेज पाटील म्हणाले.

लोकमतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला

निवडणूक लोकसभेची असो, विधानसभेची असो की जिल्हा परिषद, महापालिकेची असो. गेल्या दहा वर्षात लोकमतने कोणत्याही निवडणूकीचे अंदाज निकालाच्या आधीच वर्तवले आहेत ते तंतोतंत खरे ठरले आहेत. लोकमतने २००९ च्या लोकसभा निवडणूकीत मंडलिक-शेट्टी विजयी होणार असे महिनाभर अगोदर जाहीर केले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीतही निकालापूर्वीच धनंजय महाडिक-शेट्टी विजयी होणार असा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचे सहा आमदार विजयी होणार असल्याचे जाहीर केले, निकालही तसाच लागला. विधानसभेच्या गेल्या निवडणूकीत दहा मतदार संघात कोण विजयी होणार त्यांची नांवेच लोकमतने प्रसिध्द केली. निकालही अगदी तंतोतंत तसाच लागला.

गोकूळच्या निवडणूकीत पहिल्या दिवसापासून वार्तांकनात लोकमत सर्वात पुढे राहिला. या निवडणूकीतील निर्णायक ठरू शकणाऱ्या घडामोडी लोकमतने अगोदर दिल्या. त्यानुसारच निकालाचा कलही दिला. क्रॉस व्होटींग झाले नाही तर संघात सत्तांतर होणार असल्याचे वृत्त लोकमतने सोमवारीच दिले होते. त्यानुसारच संघाच्या निवडणूकीचा निकाल लागला आहे.

Web Title: Gokul Election Result: Gokul dominance to increase in Mumbai Says Satej Patil. Target Mahadik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.