Kolhapur: गोकुळची म्हैस दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ, आजपासून अंमलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 11:51 IST2025-01-11T11:50:55+5:302025-01-11T11:51:12+5:30
उत्पादकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न

Kolhapur: गोकुळची म्हैस दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ, आजपासून अंमलबजावणी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) आज शनिवारपासून म्हैस दूध खरेदी दरात प्रति लीटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ६.५ फॅट आणि ९.० एसएनएफ पासून पुढेही दरवाढ उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे.
गोकुळचे सध्या म्हैस दूध संकलन नऊ लाख तीस हजार लीटर प्रतिदिन इतके आहे पण मुंबई पुण्यासह सर्वच ठिकाणी दुधाला मागणी वाढत आहे. म्हैस दुधाचे उत्पादन जास्त व्हावे यासाठी संघाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी गोकुळच्या संचालक मंडळाने आजपासून खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ६.५ फॅट व ९.० एसएनएफसाठी शेतकऱ्यांना प्रति लीटर ५४.८० रुपये दर मिळणार आहे.
कोल्हापूरसह जिल्ह्याबाहेरील दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही या दरवाढीचा फायदा होणार आहे. शुक्रवारी झालेल्या सत्कार समारंभात अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी या दरवाढीचे सुतोवाच केले होते.
अशी होणार खरेदी दरात वाढ
फॅट : एसएनएफ : जुना दर : नवीन दर
६.५ - ९.० - ५२.८० - ५४.८०
७.० - ९.० - ५४.६० - ५६.६०