कुत्रा चावलेल्या तरुणीचा रेबिजची लस घेऊनही मृत्यू, कोल्हापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 11:49 AM2024-03-05T11:49:57+5:302024-03-05T11:50:12+5:30

महापालिका चौकात भटक्या कुत्र्याने घेतला होता चावा

Girl bitten by dog dies despite taking rabies vaccine, incident in Kolhapur | कुत्रा चावलेल्या तरुणीचा रेबिजची लस घेऊनही मृत्यू, कोल्हापुरातील घटना

कुत्रा चावलेल्या तरुणीचा रेबिजची लस घेऊनही मृत्यू, कोल्हापुरातील घटना

कोल्हापूर : शहरातील महापालिका चौकात भटक्या कुत्र्याने चावा घेतलेल्या तरुणीचा रेबीजची लागण होऊन मृत्यू झाला. विशेष म्हणजे तिने रेबीज प्रतिबंधक लसही घेतली होती. सृष्टी सुनील शिंदे (वय-२१ रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. शहरातील भटक्या श्वानाचा ती बळी ठरली.

सृष्टी शिंदे उच्चशिक्षित, तितकीची बोलकीही. डिझायनिंगमध्ये आता कुठे नाव होऊ लागलेले. ३ फेब्रुवारीला खरेदीसाठी ती महाद्वार रोडला गेली होती. तेथून परत येताना मैत्रिणीचा फोन आला म्हणून ती महापालिका चौक परिसरात थांबली होती. यावेळी भटक्या श्वानाने तिच्यासह २० हून अधिक नागरिकांचा चावा घेतला होता. तिला सुरूवातीला सीपीआर रुग्णालयात दाखल करत रेबिजचे इंजेक्शन देण्यात आले. 

त्यानंतर जवळपास २७-२८ दिवसांचा कालावधी उलटून गेला. या काळात तिची तब्येतही चांगली हाेती. मात्र, दोन दिवसांपूर्वी अचानक ताप आल्याने तिला पुन्हा रुग्णालयात दाखल केले असता, चावलेल्या श्वानामुळे रेबिज झाल्याचे निदान झाल्याने आई-वडिलांच्या पायाखालची वाळू सरकली. तिच्यावर उपचार सुरू असतानाच सोमवारी पहाटे तिचे निधन झाले.

करिअरचे स्वप्न अर्ध्यावरच

सृष्टीचे वडील सुनील शिंदे यांचा इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय तर आई गृहिणी आहे. त्यांच्या दोन्ही मुलींपैकी सृष्टी ही शिंदे कुटुंबातील लहान मुलगी. आपल्या मुली याच वंशाचा दिवा असतील, असा आधुनिक विचार घेऊन जगणाऱ्या सुनील शिंदे यांना मुलीच्या आकस्मिक मृत्यूने मोठा धक्का बसला आहे. सृष्टीने विवेकानंद कॉलेजमधून बी. कॉम. पूर्ण करत डिझायनिंगचा कोर्स केला होता. सध्या ती या क्षेत्रात नावारूपाला येत होती. भटका श्वान काळ बनून आल्याने तिचे करिअरचे स्वप्न अर्ध्यावरच मोडले.

रेबिजचे इंजेक्शन देऊनही रेबिज कसा काय झाला?

इंजेक्शन आवश्यक त्या तापमानावर ठेवले नव्हते का? याची शंका येते. आम्ही कुणावर विश्वास ठेवायचा. शहरात भटक्या श्वानांमुळे एखाद्याला जीव गमवावा लागत असेल तर हे शहर सुरक्षित कसे. आमच्या मुलीची यात काय चूक? - अतुल शिंदे, सृष्टीचे चुलते

Web Title: Girl bitten by dog dies despite taking rabies vaccine, incident in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.