बंद पडलेल्या साखर कारखान्यांतून इथेनॉल निर्मिती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 14:33 IST2019-11-05T14:29:45+5:302019-11-05T14:33:08+5:30
देशात १५0 हून अधिक साखर कारखाने विविध कारणांनी बंद पडले असून, त्या कारखान्यांतून थेट उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामराव देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बंद पडलेल्या साखर कारखान्यांतून इथेनॉल निर्मिती करा
कोल्हापूर : देशात १५0 हून अधिक साखर कारखाने विविध कारणांनी बंद पडले असून, त्या कारखान्यांतून थेट उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामराव देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
इथेनॉलची किंमत प्रतिलिटर २७ रुपये होती, भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यामध्ये वाढ होत गेली. सप्टेंबर २०१८ मध्ये ४८ वरून प्रतिलिटर ५९.१३ रुपये दर झाला; त्यामुळे ऊस व गोड ज्वारीपासून इथेनॉल निर्मिती करणे कारखान्यांना फायदेशीर ठरू शकते. याबाबत अनेकवेळा केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. त्याचे फळ म्हणून इथेनॉलच्या दरात वाढ झाली.
देशात मोठ्या प्रमाणात इंधनाची आयात होते. इंधनाच्या पातळीवर देश परावलंबी आहे; पण शेती मालाच्या माध्यमातून इथेनॉल निर्मिती केली, तर इंधनाची आयात करावी लागणार नाहीच; पण साखरेचे उत्पादन कमी झाल्याने आपोआपच दरात वाढ होऊन हा उद्योगही स्थिरावण्यास मदत होऊ शकते.
देशात १५५ पेक्षा अधिक, तर महाराष्ट्रात ४५ साखर कारखाने विविध कारणांनी बंद पडले आहेत. तिथे उसापासून थेट इथेनॉलची निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे.
यामुळे तेथील शेतकऱ्यांचा फायदा असून, राज्याचा सरासरी उतारा १२ टक्के गृहीत धरला, तर साखर निर्मितीतून प्रतिटन २७५० रुपये एफआरपी मिळू शकते; पण त्याच उसातून इथेनॉल निर्मिती केली, तर प्रतिटन ४१०० रुपये शेतकऱ्यांना दर मिळू शकतो; त्यामुळे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन इथेनॉल निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शामराव देसाई व सुजाता देसाई यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.
साखर व इथेनॉल निर्मितीतून मिळणारी एफआरपी
उतारा साखर निर्मिती इथेनॉल निर्मिती इथेनॉल निर्मितीने मिळणारा जादा दर
१० टक्के २२०० रुपये ३३०० रुपये ११०० रुपये
११ टक्के २४७५ रुपये ३७०० रुपये १२२५ रुपये
१२ टक्के २७५० रुपये ४१०० रुपये १३५० रुपये
१३ टक्के ३०२५ रुपये ४५०० रुपये १४७५ रुपये