खिशात गिन्न्या कमी... तरी नव्या संकल्पनांची हमी; कोल्हापूर महापालिकेच्या १५१५ कोटींच्या अंदाजपत्रकाला महासभेची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 18:35 IST2026-03-31T18:35:13+5:302026-03-31T18:35:27+5:30
उत्पन्न वाढविण्याचा आग्रह

खिशात गिन्न्या कमी... तरी नव्या संकल्पनांची हमी; कोल्हापूर महापालिकेच्या १५१५ कोटींच्या अंदाजपत्रकाला महासभेची मंजुरी
कोल्हापूर : पर्यावरणपूरक वाहतूक, पूरमुक्त कोल्हापूर, नवीन प्रशासकीय इमारत, अद्ययावत फिश मार्केट, सार्वजनिक आरोग्य आणि प्राणी कल्याण, एलिव्हेटेड कॉरिडॉर, सीसीटीव्ही प्रकल्प, कचरा व्यवस्थापन, आधुनिक स्वच्छता यंत्रसामग्री, अद्ययावत स्मार्ट वॉशरूम, सौरऊर्जा प्रकल्प अशा विविध विकास योजनांचा संकल्प करणारे कोल्हापूर महानगरपालिकेचे सन २०२६-२०२७ सालचे अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी महासभेस सादर केले. पाच तासांच्या चर्चेनंतर उपसूचनेसह अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले.
महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. नवीन वर्षाचे महापालिका अंदाजपत्रक १५१५ कोटी रुपयांचे आहे. त्यावरील चर्चेवेळी अनेक सदस्यांनी उत्पन्न वाढीवर जोर दिला आणि प्रशासनाच्या चुकांवरही बोट ठेवले.
२५ वर्षे बसून पगार, अधिकारी करतात काय?
दैनंदिन खर्चात कपात करणे उत्पन्न वाढविण्याइतकेच महत्त्वाचे आहे याकडे लक्ष वेधत प्रा. जयंत पाटील यांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार केला. पण, एकाही प्रश्नाचे नीट उत्तर अधिकाऱ्यांना देता आले नाही. निलंबित कर्मचाऱ्यांचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी एक कर्मचारी पंचवीस वर्षे निलंबित असून, महिन्याला एक लाख ६८ हजार पगार दिला जात आहे. असे १९ कर्मचारी बसून पगार घेत आहेत. किती वर्षे त्यांची विभागीय चौकशी करणार आहात? अशा कर्मचाऱ्यांना फुकट का पोसतोय? अधिकारी करतात काय? अशी विचारणा केली.
काय चाललंय महापालिकेत?
पाणी सोडणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दोन-चार महिने पगार दिला जात नाही आणि घरी बसून पगार घेणाऱ्यांवर प्रशासन खर्च करत आहे. महापालिकेत नेमकं काय चाललंय? अशा सवाल महापौर निकम यांनी प्रशासनाला विचारला.
महापालिका अंदाजपत्रकातील तरतुदी
- पर्यावरण वाहतूक अंतर्गत १०० ई बसेस घेणार
- पूरमुक्त कोल्हापूर अंतर्गत ४११ कोटींची निविदा अंतिम टप्प्यात
- शेंडा पार्क १०३ कोटींच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी तरतूद
- राजेपाध्येनगर येथे ५०.६५ कोटींचे अद्ययावत चार मजली फिशमार्केट उभारणार
- ६५ लाख रुपये खर्च करून २०० क्षमतेचे ॲनिमल शेल्टर उभारणार
- दुसऱ्या टप्प्यातील सीसीटीव्ही प्रकल्पासाठी १५ कोटींचा प्रस्ताव
- चार ठिकाणी घनकचरा प्रकल्पासाठी ११.११ कोटींची तरतूद
- २० नवीन ऑटोटिप्पर घेण्यासाठी दोन कोटींची तरतूद
- तीन नवीन अत्याधुनिक गटर सफाई मशिन्स खरेदी करणार
- राजारामपुरी येथे २०० चौ. फू. क्षेत्रफळात अद्ययावत स्मार्ट महिला पावडर रूम, वॉशरूम उभारणार
- रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी तीन रोड स्विपिंग मशिन्स घेणार
- ३०० किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्पाला मंजुरी, १५ कोटींचा निधी खर्च करणार
- स्वीमिंगपूलचे अद्ययावतीकरण करण्यासाठी तीन कोटींची तरतूद
- महापालिकेच्या शाळा स्मार्ट बनविणार.