Kolhapur: अल्पवयीन मुलीची वेश्या व्यवसायासाठी विक्री करणाऱ्या आईसह टोळीचा डाव उध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 18:24 IST2023-04-12T18:22:02+5:302023-04-12T18:24:34+5:30
मध्यस्थी टोळीच्या मदतीने तिने पुन्हा मुलीची परराज्यात वेश्या व्यवसायासाठी विक्री करण्याचा घाट घातला. पण...

Kolhapur: अल्पवयीन मुलीची वेश्या व्यवसायासाठी विक्री करणाऱ्या आईसह टोळीचा डाव उध्वस्त
इचलकरंजी : येथील एका अल्पवयीन मुलीची वेश्या व्यवसायासाठी विक्री करणाऱ्या तिच्या आईसह टोळीला शहापूर पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीला कोल्हापूरातील बालकल्याण संकुलात पाठवले. तर तिच्या आईची चौकशी करून सोडून दिले. परंतु, चौकशीसाठी त्यांना बसवून ठेवलेल्या खोलीतून मुलीसह सर्वजण काही वेळातच पळाले होते. पोलिसांनी पुन्हा त्यांचा शोध घेऊन मुलीला व आईला ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांतून व सामाजिक कार्यकर्त्या महिलेकडून मिळालेली माहिती अशी, नवऱ्याने सोडलेल्या एका महिलेने आपल्या आठ वर्षाच्या मुलीची विक्री आपल्या शेजारच्या एका जिल्ह्यात केली होती. परंतु काही दिवसांनी पुन्हा त्या मुलीला तिने परत घरी आणले. त्यानंतर काही मध्यस्थी टोळीच्या मदतीने तिने पुन्हा मुलीची परराज्यात वेश्या व्यवसायासाठी विक्री करण्याचा घाट घातला. ही माहिती एका सामाजिक कार्यकत्या महिलेला समजली. तिने स्वतःच त्या महिलेशी संपर्क साधत मध्यस्तीची भूमिका घेतल्याचे संगत पोलिसांच्या मदतीने मंगळवारी सकाळी सापळा रचला.
त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत एक मध्यस्थी, अल्पवयीन मुलीसह तिच्या आईला ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले. तेथे चौकशीसाठी एका खोलीत बसवले. त्यावेळी नजर चुकून सर्वांनी पोलीस ठाण्यातून पलायण केले. पोलिसांनी शोध घेऊन पुन्हा मुलीला व तिच्या आईला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली आणि अल्पवयीन मुलीला कोल्हापुरातील बालकल्याण संकुलात पाठवले तर तिच्या आईची चौकशी करून सोडण्यात आले. साथीदार मध्यस्ती मात्र फरार झाला. या प्रकरणाचा सखोल तपास करणार असल्याचे पोलीस उपाधीक्षक रामेश्वर वैंजने यांनी सांगितले.