The Ganeshotsav will have the honor of being a simple training institution | गणेशोत्सव साधेपणाने करणाऱ्या तालीम मंडळांचा होणार गौरव
गणेशोत्सव साधेपणाने करणाऱ्या तालीम मंडळांचा होणार गौरव

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या हस्ते २८ आॅगस्टला सन्मानपत्र केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर : कोल्हापूरवर ओढवलेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणाऱ्या सुमारे ३०० गणेश मंडळे, तालीम संस्थांचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी दिली.

शहरातील मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, जुना बुधवार, राजारामपुरी, संभाजीनगर परिसरातील सुमारे ३०० गणेश मंडळे, तालीम संस्थांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उत्सवाचा डामडौल, सजावट, देखावे रद्द करून जमा झालेला सगळा निधी पूरग्रस्तांना घरे बांधण्यासाठी दिला जाणार आहे.

या निर्णयाचा कौतुक सोहळा म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने २८ आॅगस्टला केशवराव भोसले नाट्यगृहात गणराया अ‍ॅवार्डचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मंडळ, तालीम संस्थांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे हस्ते सन्मानपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास महापौर माधवी गवंडी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित राहणार आहेत.

गणेशोत्सव २ सप्टेंबरपासून सुरू होत आहे; त्यासाठी कोल्हापूरकरांची तयारी सुरू असताना महापुराने थैमान घातले. गावे, घरे, जनावरे, आयुष्यभराची जमापुंजी, संसार सगळे काही नद्यांनी आपल्या कवेत घेतले. ओसरत असलेल्या पुराने नागरिकांच्या डोळ्यांत मात्र अश्रूंचा महापूर आणला आहे.

अस्मानी संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, जुना बुधवार पेठ, राजारामपुरी, संभाजीनगरसह उपनगरातील ३०० पेक्षा जास्त तरुण मंडळे, तालीम संस्थांनी एकमताने यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करून जमा झालेला वर्गणीचा पैसा पूरग्रस्तांना घरे बांधण्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आहे.

 

 


Web Title: The Ganeshotsav will have the honor of being a simple training institution
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.