पूरकाळात घरफोडी करणारी टोळी गजाआड: तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 15:04 IST2019-09-09T15:02:25+5:302019-09-09T15:04:12+5:30
प्रलयकारी महापुराच्या परिस्थितीत पूरग्रस्त भागांतील बंद घरांना लक्ष्य करून तब्बल ११ घरफोड्या करणाऱ्या टोळीला पोलिसांनी शनिवारी (दि. ७) गजाआड केले.

पूरपरिस्थितीत करवीर तालुक्यातील वडणगेसह आसपासच्या गावांत घरफोड्या करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून सुमारे सहा लाखांचा सोन्याचांदीचा मुद्देमाल जप्त केला.
कोल्हापूर : प्रलयकारी महापुराच्या परिस्थितीत पूरग्रस्त भागांतील बंद घरांना लक्ष्य करून तब्बल ११ घरफोड्या करणाऱ्या टोळीला पोलिसांनी शनिवारी (दि. ७) गजाआड केले. या टोळीतील आकाश रघुनाथ चव्हाण (वय २७, रा. मूळ कोते, ता. राधानगरी, सध्या रा. वडणगे, ता. करवीर), योगेश बाबूराव संकपाळ (३१, रा. लोणार वसाहत, उचगाव, ता. करवीर) आणि धोंडिराम ऊर्फ रामा रंगराव पाटील (३३, रा. वडणगे, ता. करवीर) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर साहित्य असा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. संशयितांनी ११ गुन्ह्यांची कबुली दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक देशमुख म्हणाले, ‘वडणगे येथील जौंदाळ मळा परिसरात ६ ते १० आॅगस्ट दरम्यान पुराचे पाणी आले होते. या ठिकाणी राहत असलेले विनोद प्रसाद जौंदाळ यांचे कुटुंबीय आणि शेजारील नागरिक नातेवाइकांच्या घरी राहण्यासाठी गेले होते.
दरम्यान, जौंदाळ यांचा आणि शेजारील नागरिकांचा बंद घराचा दरवाजा तोडून, संशयित चोरटे धोंडिराम पाटील, आकाश चव्हाण आणि योगेश संकपाळ यांनी लोखंडी तिजोरीतील सात तोळे अडीच ग्रॅम वजनाचे सोने लंपास केले होते.
या गुन्ह्यात त्यांना करवीर पोलिसांनी अटक केली होती. संशयितांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. संशयितांकडून १९ तोळ्यांचे सोन्याचे, चांदीचे दागिने, देवदेवतांच्या पितळेच्या मूर्ती, कॉम्प्युटर आणि मोटारसायकल असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.’
ही कारवाई करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात, प्रशांत माने, राजू जरळी, दीपक घोरपडे, गुरू झांबरे, सुहास पाटील, युक्ती ठोंबरे, राम माळी, सचिन बेंडखळे यांनी केली.
करवीरसह राधानगरी तालुक्यातील घरफोड्या उघड
अधिक तपासात संशयित चोरट्यांनी करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडणगे, चिखली, शिंगणापूर, नागदेववाडी, फुलेवाडी रिंग रोड, पीरवाडी, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, आर. के.नगर भागात घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच राधानगरी तालुक्यातील कोते गावातील मंदिरात व दूध डेअरी येथेही घरफोडी केल्याचे संशयितांनी पोलिसांना सांगितले आहे.