अजित पवार म्हणतात निधी दिला..पण कोल्हापूरला नाही मिळाला; निधीअभावी विकासकामे रखडली
By भारत चव्हाण | Updated: November 7, 2025 16:52 IST2025-11-07T16:50:58+5:302025-11-07T16:52:49+5:30
महापालिकेवर टीकेचे खापर

अजित पवार म्हणतात निधी दिला..पण कोल्हापूरला नाही मिळाला; निधीअभावी विकासकामे रखडली
भारत चव्हाण
कोल्हापूर : राज्य सरकारकडून कोल्हापूरच्या विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाला. निधीचे आकडे कोटींच्या घरात आहेत. त्याचे फलकही शहरभर झळकले, परंतु मंजूर निधी उपलब्ध होत नसल्याने विकास कामे रखडली आहेत. निधी नसल्याने बरीच कामे बंद अथवा अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाची अवस्था ‘आई जेवू घालिना, बाप भीक मागू देईना’ अशी झाली आहे.
कोल्हापुरात बुधवारी खासदार शाहू छत्रपती यांनी कोल्हापूरच्या रखडलेल्या प्रश्नांची यादीच मांडली. ती ऐकल्यानंतर काहीसे संतप्त झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्ही कोल्हापूरसाठी कोणत्या कामांसाठी किती कोटी रुपयांचा निधी दिला याची आकडेवारी धडाधड सांगून टाकली. त्यातील महापालिकेला प्रत्यक्षात किती रक्कम मिळाली याची गुरुवारी ‘लोकमत’ने खातरजमा केली.
त्यामध्ये मंत्री पवार यांनी जाहीर केलेला निधी प्रत्यक्षात महापालिकेकडे आला नसल्याचे स्पष्ट झाले. निधी मंजूर आहे म्हटल्यावर आज उद्या येईल या आशेने निविदा प्रक्रिया राबवून वर्कऑर्डर दिल्या. कामे सुरू झाली खरी, पण निधी नसल्याने कामे रेंगाळली. त्यामुळे निधी आणणारे आणि महापालिका प्रशासन पुरते बदनाम झाले आहे.
हा घ्या आरसा....
सांडपाणी प्रकल्प : मंजूर २८७ कोटी, मिळाले ३.५० कोटी
शहरातील पूर्वभागातील सांडपाणी, मैलामिश्रीत सांडपाणी याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी राज्य सरकारकडून अमृत योजनेतून २८७ कोटींचे पाच प्रकल्प मंजूर झाले आहेत. त्या कामांची वर्कऑर्डर होऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला, परंतु मंजूर निधीतील केवळ साडेतीन कोटी रुपये महापालिकेला प्राप्त झाले.
नगरोत्थानमधून रस्ते : मंजूर १०० कोटी ३३ लाख, मिळाले २३ कोटी ४१ लाख
राज्यस्तर नगरोत्थान योजनेतून शहरातील सोळा रस्ते करण्याकरिता १०० कोटी ३३ लाखाचा निधी मंजूर झाला. गेल्यावर्षी कामाला सुरुवात झाली. मंजूर निधीतील २३ कोटी ४१ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. ठेकेदाराची बिले देऊन पुढील काम सुरू होण्याकरिता ४६ कोटी ८२ लाखांच्या निधीसाठी पालिका प्रशासनाने दोनवेळा राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला. परंतु त्याला उत्तरही नाही आणि निधी सोडण्यास आलेला नाही. त्यामुळे ही कामे संथ गतीने सुरू आहेत.
४५ कोटी कुठे आहेत..?
शिंदेसेनेत प्रवेश केलेल्या सत्यजित कदम यांनी मूूलभूत सेवा-सुविधा योजनेतून राज्य सरकारकडून २५ कोटींचा निधी मंजूर करून आणला. त्यामध्ये प्रामुख्याने शहरातील रस्ते आणि गटारीच्या कामांचा समावेश आहे. आणखी एकदा मूलभूत सेवा-सुविधा योजनेतून २० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला, तोही निधी आला नाही. त्यामुळे या ४५ कोटीमध्ये धरण्यात आलेल्या कामांचे अजून नारळही फुटलेले नाहीत.
केएमटी चार्जिंग सेंटर : मंजूर १७ कोटी १८ लाख, मिळाले ४ कोटी ३० लाख
केएमटीकडे लवकरच ई बसेस येणार आहेत. त्यांच्या चॅर्जिंग स्टेशन व डेपो अद्ययावतीकरणाकरिता १७ कोटी १८ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्याची कामेही सुरू आहेत. मंजूर निधीतील ४ कोटी ३० लाखांचाच निधी प्राप्त झाला आहे.
‘केशवराव भोसले उभारणी : मंजूर २५ कोटी, मिळाले १२ कोटी ५० लाख
केशवराव भोसले नाट्यगृहाला २५ कोटी १० लाख मंजूर झाले, त्यापैकी १२ कोटी ५० लाखांचा निधी आला आहे. उर्वरित निधीदेखील लवकर उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे.
दोन वर्षे वित्त आयोगाची दमडी नाही..
पंधराव्या वित्त आयोगातून महानगरपालिकेला प्रत्येक वर्षी १८ ते २० कोटींचा निधी दिला जातो. अडीच वर्षांपूर्वी एकदा निधी आला, त्यानंतर मागच्या दोन वर्षांत एक रुपयाही आलेला नाही.