‘स्वाभिमानी’चा आजरा कारखान्यावर मोर्चा
By Admin | Updated: July 12, 2014 00:43 IST2014-07-12T00:30:12+5:302014-07-12T00:43:19+5:30
संचालक व संघटनेची एकत्रित बैठक घेण्याचा निर्णय

‘स्वाभिमानी’चा आजरा कारखान्यावर मोर्चा
आजरा : सन २०१३-१४ सालाकरिता आजरा साखर कारखान्यातून गाळप झालेल्या ऊसास दुसरी उचल प्रतिटन ५०० रूपयाप्रमाणे मिळावी यासह विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीने राजेंद्र गड्यान्नावर व तानाजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली आजरा साखर कारखान्यावर मोर्चा काढला. अध्यक्ष विष्णूपंत केसरकर, संचालक मंडळ व स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर स्वाभिमानीचे आंदोलन संपुष्टात आले.
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास स्वाभिमानीचे कार्यकर्ते कारखाना कार्यस्थळी घोषणाबाजी करीत दाखल झाले. यावेळी अध्यक्ष केसरकर यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावले.
चर्चेदरम्यान गड्यान्नावर म्हणाले, खास. राजू शेट्टी यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारला साखर उद्योगाबाबत सकारात्मक पावले उचलावी लागली आहेत. केवळ ऊस उत्पादक नव्हेच तर साखर कारखानदारांच्या बाजूनेही केंद्र सरकारला निर्णय घेणे भाग पडले.
आजरा साखर कारखान्यातील सत्तेत स्वाभिमानी घटक पक्ष असला तरीही स्वाभिमानी बऱ्याच गोष्टीपासून अनभिज्ञ आहे. वारणा-आजरा हिशेबाचे घोंगडे अद्याप भिजतच आहे. संचालक मंडळाला गांभीर्य नाही. भविष्यात अनेक अडचणींशी कारखान्याला सामना करावा लागणार आहे. याचेही भानही संचालक मंडळाने ठेवावे. ५०० रूपयांची दुसरी उचल मिळावी यावर संघटना ठाम आहे.
संघटनेचे तालुकाध्यक्ष तानाजी देसाई म्हणाले, कारखान्याचा कारभार पारदर्शी असावा यासाठी संघटना आग्रही आहे. सरकारकडून कारखान्याला किती पॅकेल मिळाले ? त्याचा विनीयोग कसा केला ? याची माहिती संचालक मंडळाने स्पष्ट करावी.
अशोक चराटी म्हणाले, काटकसरीने कारभार करून कारखान सुस्थितीत आणला आहे. त्यामुळे कारखान्याचे भवितव्य हे उज्वल आहे. कारखान्याची सध्याची आर्थिक स्थिती विचारात घेवून दुसऱ्या उचलीबाबत शंभर रूपयांची उचल देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही स्पष्ट केले.
अध्यक्ष केसरकर म्हणाले, शेतकरी संघटना व कारखान्याचे संचालक यात कांही अंतर नाही. संघटनेने केंव्हाही येवून कारखान्याच्या कारभाराची, खर्चाची ताळेबंदाची माहिती घ्यावी, याकरिता स्वाभिमानीने तारीख द्यावी त्या दिवशी बैठक घेतली जाईल असेही स्पष्ट केले.
चर्चेत उपाध्यक्ष मारूती घोरपडे, संचालक अबुताहेर तकिलदार, बी. टी. जाधव, नितीन पाटील, आप्पासाहेब देसाई, कृष्णा पाटील, सखाराम केसरकर, कार्यकारी संचालक पी. एल. हरेर यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)