Kolhapur: रहदारीचा रस्ता बंद असल्याने वन्यजिवांचा मुक्त संचार, दाजीपूर अभयारण्यातील प्राण्यांचे स्थानिकांना दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 17:27 IST2025-04-19T17:27:17+5:302025-04-19T17:27:58+5:30
गौरव सांगावकर राधानगरी : मागील महिन्यापासून राधानगरी-दाजीपूर रस्ता दुरुस्तीचे काम चालू असल्याने या मार्गांवरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली ...

Kolhapur: रहदारीचा रस्ता बंद असल्याने वन्यजिवांचा मुक्त संचार, दाजीपूर अभयारण्यातील प्राण्यांचे स्थानिकांना दर्शन
गौरव सांगावकर
राधानगरी : मागील महिन्यापासून राधानगरी-दाजीपूर रस्ता दुरुस्तीचे काम चालू असल्याने या मार्गांवरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. या ४० दिवसांच्या कालावधीत अभयारण्यातील वन्यजीव निर्भयपणे या मार्गावर मुक्त संचार करू शकले. वाहनांची वर्दळ, कर्कश आवाज, हॉर्न यापासून प्राण्यांना काही काळ दिलासा मिळाला. यामुळे राधानगरी-दाजीपूर रस्त्यावर स्थानिकांना वन्यजिवांचा मुक्तपणे संचार होत असल्याचे दिसून येत आहेत.
यामध्ये भेकर, साळिंदर, अजगर, अस्वल, बिबट्या, गवे, रानडुकरे, खवल्या मांजर, कोल्हे या प्राण्यांसह रानकोंबड्या, पन्ना कबूतर, सर्प गरुड, घुबड, हॉर्नबिल, स्वर्गीय नर्तक या पक्ष्यांचा रस्त्यावर मुक्त संचार आढळून आला. ३५१.१६ चौरस किलोमीटर क्षेत्र असणाऱ्या दाजीपूर अभयारण्यातील इदरगंज पठारपासून सुरंगी ते काळम्मावाडी या क्षेत्रालगत हा रस्ता असल्याने या क्षेत्रातील प्राणी मुख्य रस्त्यावर निर्भयपणे फेरफटका मारू शकले.
दाजीपूर अभयारण्यातील हेच प्राणी पाहण्याकरिता पर्यटकांना अभयारण्य क्षेत्रात फिरावे लागते, पण आत्ता याच प्राण्याचे दर्शन स्थानिकांना सहजरीत्या घेता आले. यामुळे राधानगरी अभयारण्यातील गव्यांसोबत इतर दुर्मीळ वन्यजीवही दृष्टीस पडले.
या मार्गावरील वाहतूक चालू झाल्यानंतर पर्यटकांनी वाहनांचा हॉर्न, वेगावर नियंत्रण ठेवल्यास या वन्यजिवांना अभय मिळेल. तसेच हे दुर्मीळ प्राणी आपणासही सहज पाहता येतील - रुपेश बोंबडे, उपाध्यक्ष बायसन नेचर क्लब, राधानगरी.