जादा परताव्याच्या आमिषाने माजी सैनिकाची फसवणूक, कर्नाटकातील चौघांवर कोल्हापुरात गुन्हा दाखल
By उद्धव गोडसे | Updated: March 20, 2023 16:12 IST2023-03-20T16:11:53+5:302023-03-20T16:12:15+5:30
परतावा आणि मूळ रक्कमही परत मिळत नसल्याने पोवार यांनी पोलिसात धाव घेतली

जादा परताव्याच्या आमिषाने माजी सैनिकाची फसवणूक, कर्नाटकातील चौघांवर कोल्हापुरात गुन्हा दाखल
कोल्हापूर : टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीद्वारे केलेल्या गुंतवणुकीवर मूळ रकमेसहित दरमहा पाच टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून कर्नाटकातील एका कंपनीने माजी सैनिकाची फसवणूक केली. याबाबत माजी सैनिक सचिन सखाराम पोवार (वय ४०, रा. हलसवडे, ता. करवीर) यांची तीन लाख नऊ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद रविवारी (दि. १९) शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल केली.
पोवार यांच्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलिसांनी मंजुनाथ व्यंकटेश, आर. टी. व्यंकटेश मूर्ती, गीता मंजुनाथ आणि निकिता मंजुनाथ (सर्व रा. शक्तीनगर, म्हैसूर, कर्नाटक) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित मंजुनाथ याच्या हिंदुजा ग्लोबल फायनान्स प्रा. लि. कंपनीचे कार्यालय ताराबाई पार्क येथील गोल्ड जीमच्या बाजुच्या गाळ्यात सुरू होते. चाणक्य टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी चालवणारे माजी सैनिक सचिन पोवार हिंदुजा ग्लोबल फायनान्स कंपनीत कामानिमित्त गेले होते.
त्यावेळी कर्मचा-यांनी पोवार यांना फायनान्स कंपनीत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. गुंतवणुकीच्या रकमेवर त्यांना दरमहा पाच टक्के परतावा देण्याचे आमिषही दाखवले. त्यानुसार पोवार यांनी ९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२२ या कालावधित हिंदुजा ग्लोबल फायनान्स कंपनीत तीन लाख नऊ हजार रुपये गुंतवले. मात्र, त्यावरील परतावा आणि मूळ रक्कमही परत मिळत नसल्याने पोवार यांनी पोलिसात धाव घेतली.