आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा, मुरगूड पोलिस ठाण्याबाहेर तणाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 15:57 IST2023-02-25T15:52:13+5:302023-02-25T15:57:11+5:30
गुन्ह्याची कुणकुण मुश्रीफ समर्थकांना लागताच रात्री उशिरापर्यंत पोलिस स्टेशन आवारात मोठी गर्दी केली होती

आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा, मुरगूड पोलिस ठाण्याबाहेर तणाव
मुरगूड : सहकारी तत्त्वावर साखर कारखाना काढतो म्हणून आमच्याकडून प्रत्येकी दहा हजार रुपयांप्रमाणे शेअर्स भांडवल घेऊन खाजगी कारखाना काढला आणि सुमारे चाळीस कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार कागल येथील विवेक विनायक कुलकर्णी यांनी मुरगूड पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. त्यानुसार मुरगूड पोलिसांनी माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर कलम ४२० प्रमाणे आज शुक्रवारी दुपारी गुन्हा नोंद केला आहे. याची कुणकुण लागताच मुश्रीफ समर्थकांनी रात्री उशिरापर्यंत पोलिस स्टेशनला गराडा घातला होता.
पोलिस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, विवेक विनायक कुलकर्णी आणि अन्य सोळा जणांनी संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या माध्यमातून आमदार हसन मुश्रीफ यांनी फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये मुश्रीफ यांनी सन २०१२ मध्ये अनेक सभा घेऊन आपण सहकारी तत्त्वावर साखर कारखाना काढणार आहे, असे लोकांना सांगून त्यासाठी शेअर्स भांडवल म्हणून प्रत्येकी दहा हजार देण्याचे आवाहन केले होते. त्या बदल्यात पाच किलो साखर आणि अन्य लाभ मिळतील, असे प्रलोभन दाखवले होते.
त्यानुसार आम्ही पैसे भरले त्यानंतर आम्हास साखर कार्ड बिगर ऊस उत्पादक सभासद या सदराखाली दिले. तसेच याबाबत कोणतीही पावती किंवा शेअर्स सर्टिफिकेट दिले नाही. सदरच्या शेअर्स रकमा कागल येथील जिल्हा बँक शाखा एक व दोन मध्ये मुश्रीफ यांच्या व्यक्तिगत व सर सेनापती शुगर पब्लिक लि. नियोजित नावे भाग देतो, म्हणून पैसे गोळा केले होते. अद्यापपर्यंत आम्हाला योग्य भाग प्रमाणपत्र मिळाले नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. मुश्रीफ यांनी आपल्या राजकीय पदाचा व वर्चस्वाचा गैरवापर करत गोरगरीब लोकांना शेअर्स देतो, असे सांगून फसवणूक केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मुश्रीफ समर्थकांची मोठी गर्दी
दरम्यान, या गुन्ह्याची कुणकुण मुश्रीफ समर्थकांना लागताच रात्री उशिरापर्यंत पोलिस स्टेशन आवारात मोठी गर्दी केली होती. कोणी कसला गुन्हा नोंद केला, याबाबतची माहिती पोलिस द्यावयास टाळाटाळ करत होते. सपोनि विकास बडवे जिल्हा पोलिस प्रमुखांना भेटण्यास गेले होते, त्यामुळे शेकडो समर्थक प्रचंड चिडले होते. पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. वातावरण तणावपूर्ण बनले होते.