बावड्याच्या नागरी वस्तीत कोल्ह्याची दहशत, गोठ्यातील रेडकाला केले रक्तबंबाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 20:55 IST2025-12-23T20:54:43+5:302025-12-23T20:55:07+5:30
Kolhapur: कसबा बावडा शहरात यापूर्वी बिबट्याने येऊन धुमाकूळ घातलेला किंवा गव्यांच्या कळपाने येऊन दहशत निर्माण केल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. पण आता याच्या जोडीला कोल्ह्यानेही दहशत माजवायला सुरुवात केली आहे.

बावड्याच्या नागरी वस्तीत कोल्ह्याची दहशत, गोठ्यातील रेडकाला केले रक्तबंबाळ
कसबा बावडा - शहरात यापूर्वी बिबट्याने येऊन धुमाकूळ घातलेला किंवा गव्यांच्या कळपाने येऊन दहशत निर्माण केल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. पण आता याच्या जोडीला कोल्ह्यानेही दहशत माजवायला सुरुवात केली आहे. मंगळवारी दुपारी बावड्याच्या नागरी वस्तीत आणि गल्ल्यांमधून पूर्ण वाढ झालेल्या कोल्ह्याने फेरफटका मारून चांगलीच दहशत दाखवली. या कोल्ह्याने गोठ्यात बांधलेल्या रेडकाच्या तोंडाचा कडकडून चावा घेऊन त्याला रक्तबंबाळ केलेच शिवाय गल्लीतून सैरावैरा पळत त्याने दहशती माजवली. त्यामुळे नागरिकात मोठी घबराट निर्माण झाली. दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला.
बावड्यात कोल्हा आल्याचे समजताच परिसरातील बावडा रेस्क्यू फोर्सच्या तरुणांनी त्याला पकडण्यासाठी पाठलाग केला. याच दरम्यान बिथरलेल्या कोल्ह्याने पिंजार गल्ली येथील संतोष तवार यांच्या परसदारातील बांधलेल्या रेडकाच्या तोंडाचा चावा घेवून पळ काढला. दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत या कोल्ह्याने सर्वांना हुलकावणी दिली आणि तो गायब झाला. सोशल मीडियावर याबाबत माहिती येताच दुपारपासून बावड्यात कोल्ह्याची चर्चा सुरू झाली.
येथील वाडकर गल्लीमध्ये हा कोल्हा सर्वप्रथम नागरिकांच्या निदर्शनास आला. गल्लीतील तरुणानी दुचाकीवरून त्याचा पाठलाग केला. तसेच या बाबत बावडा रेस्क्यू फोर्सच्या माहिती दिली आणि कोल्ह्याला पकडण्यासाठी बावडा रेस्क्यू फोर्सचे कार्यकर्ते हजर झाले. या कार्यकर्त्यांनी त्याचा वाडकर गल्लीपासून मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता सदर कोल्हा आंबेडकर उद्यान मार्गे ओम गल्ली येथून संकपाळनगर पर्यंत दिसून आला. त्यानंतर तो गोळीबार मैदान परिसरात गायब झाला. या घटनेमुळे अनेकांनी आपल्या लहान मुलांना यावेळी घराबाहेर जाण्यापासून रोखले.
बावडा रेस्क्यू फोर्सचे विनायक आळवेकर, प्रदीप उलपे, मुकेश शिंदे, मानसिंग जाधव, नितीन माने, सुनील पाटील, निशिकांत कांबळे, रुपेश पाटील, अक्षय निकम, इम्रान इनामदार आदींनी त्याला पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. वन्यजीव पथकाचे सदस्य आशुतोष सूर्यवंशी व ओंकार काटकर यांनी यानंतर चावा घेतलेल्या रेडकाची पाहणी करून खात्री केली.
उसाच्या फडात कोल्ह्यांचा वावर...
कसबा बावड्यातील नदीकाठच्या उसाच्या फड्यात कोल्ह्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. सध्या गळीत हंगाम सुरू झाल्याने उसाची शिवारं मोकळी होऊ लागली आहेत. त्यामुळे बितरलेला कोल्हा नागरी वस्तीत आल्याची शक्यता वर्तवली जात आहे