HSC Exam Result 2025: ऑडिओ, ब्रेल लिपीतून अभ्यास केला, कोल्हापुरातील चार अंध विद्यार्थ्यांचे लखलखीत यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 12:46 IST2025-05-06T12:45:45+5:302025-05-06T12:46:09+5:30
महानगरपालिकेचा हातभार

HSC Exam Result 2025: ऑडिओ, ब्रेल लिपीतून अभ्यास केला, कोल्हापुरातील चार अंध विद्यार्थ्यांचे लखलखीत यश
कोल्हापूर : राज्यातील १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये हणबरवाडी अंध युवक मंच संचलित राजोपाध्ये नगर येथील अंध वसतिगृहातील चार विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळवले आहे. यामध्ये तीन मुलींनीही बाजी मारली. या सर्वच विद्यार्थ्यांना सक्षम या संस्थेने ऑडिओ आणि ब्रेल लिपीतून १२ वी परीक्षेचा अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिला होता.
इयत्ता १२ वीच्या परीक्षेत कोल्हापुरातील अंध वसतिगृहात राहून गरीब कुटुंबातील चार विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवत देदिप्यमान यश मिळवले आहे. या चारही विद्यार्थ्यांनी गोखले कॉलेजमधून बारावीच्या परीक्षेसाठी कला शाखेतून परीक्षा दिली होती. पूनम धनगर हिने ५१ टक्के, पौर्णिमा मर्दाने हिने ५३ टक्के, पूजा बलराम खान्नूरकर हिने ४९ टक्के आणि आदिनाथ भिसे याने ५२ टक्के गुण मिळवले. पौर्णिमाला सुयोग कोल याने, पूनमला यश माळवी याने, आदिनाथला साहिल सुतारने आणि पूजाला श्वेता जाधव हिने लेखनिक म्हणून सहकार्य केले.
महानगरपालिकेचा हातभार
महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीअंतर्गत समग्र शिक्षा अभियानातून या दिव्यांग विद्यार्थ्यांना, मदतनीस भत्ता, विद्यावेतन, प्रवास भत्ता, लेखनिक भत्ता, वाचनिक भत्ता आणि प्रोत्साहन भत्ता मिळाल्याने त्यांना अभ्यास करता आला. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या मनपाच्या शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केले.